सिनेमा – ‘जेलर’ची जादू

प्रा. अनिल कवठेकर

तामीळ चित्रपटांचं स्वतचं एक खास वैशिष्टय़ आहे. पहिल्या चाळीस मिनिटांमध्ये सामान्य गोष्टी घडतात आणि अचानक चाळिसाव्या मिनिटानंतर अनेक वेगवेगळ्या घटना घडू लागतात. या चित्रपटात एक किंवा दोन कथा एकमेकांत सफाईदारपणे गुंतवलेल्या असतात. त्यामुळेच प्रेक्षक त्यात गुंतून जातात आणि एक यशस्वी चित्रपट निर्माण होतो. हे सगळं ‘जेलर’ चित्रपटालाही लागू पडतं. रजनीकांत ‘जेलर’चा मुख्य नायक असेल तर त्या कथेची मांडणी कशीही केली तरी तो चित्रपट सुपरहिट होणारच. कारण रजनीकांतच्या जादुई अभिनयाची जादू त्याच्या चाहत्यांच्या मनावर एक गारुड करून राहिलेली आहे.

चित्रपट चालू होतो, पण रजनीकांतच्या इतर चित्रपटांप्रमाणे ‘जेलर’मध्ये रजनीकांतच्या स्टाईलमध्ये  त्याची एंट्री होत नाही. आठव्या मिनिटाला रजनीकांतची एंट्री होते, पण हाणामारी नाही. रजनीकांत एक निवृत्त जेलर आहे आणि तो सामान्य मध्यमवर्गीय माणसाप्रमाणे एका छोटय़ाशा ब-ंगल्यात राहतो. त्याचा मोठा मुलगा एसीपी आहे. रजनीकांत आजोबा झालेला असल्यामुळे 60-65 वर्षांच्या माणसाच्या देहबोलीतून त्याचा अभिनय दिसतो. प्रत्यक्षात जरी तो 73 वर्षांचा असला तरी नायक म्हणून तो नेहमी पन्नाशीच्या आतच असतो आणि त्याला नायिकाही असते. या चित्रपटात मात्र तो निवृत्त माणसासारखा रस्त्याने चालताना घाबरतो. त्याला घाबरवण्यासाठी त्याच्या अंगावर शेजारी गाडी घालतो. रजनीकांत घाबरून रस्ता सोडून बाजूला पडतो. हातातली भाजीची पिशवी सांडते. असं बऱयाच वेळा घडतं. गाडीवाला त्याला म्हणतो, “किती घाबरतोस रे? मी तुला खरंच मारणार आहे का?” रजनीकांत शांत राहतो. काही बोलत नाही. असं दाखवण्यामागचं कारण असं की, नंतरच्या दृश्यात निवृत्त जेलर त्याच्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अत्यंत तडफेने तयार होतो. या नव्या जेलरच्या अंगावर गाडी येते तेव्हा तो रस्त्याच्या मध्यभागी उभा राहतो. त्याच्या हातात भाजीची पिशवी नसते. हा बदल प्रेक्षकांना टाळ्या-शिट्टय़ा वाजवण्यासाठी पुरेसा असतो.

त्याचं भाजी आणायला जाणं, नातवाशी खेळणं, नातवाचे बूट पॉलिश करणं, एसीपी मुलाचे बूट पायात असताना पॉलिश करणं वगैरे निवृत्त माणसाची कामं तो मजेत करतो. रजनीकांत एक प्रामाणिक जेलर असतो. मध्यमवर्गीयपणा त्याच्या साध्या घरातल्या सामानात आणि फर्निचरमधून दिसतं. रजनीकांतने त्याच्या कारकीर्दीत कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार केलेले नसतात. अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावलेली असते. त्याचा हा प्रामाणिकपणा त्याच्या एसीपी मुलाने स्वीकारलेला आहे.

मंदिरातील मूर्ती चोरी झाल्याचा एसीपे छडा लावत असतो आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळे तो गायब होतो. रजनीकांतचं सर्वस्व हरवतं. तो वेडय़ासारखा आपल्या मुलाला शोधतो. त्याचे सगळे मार्ग संपतात. शेवटी त्याला कळतं की, त्या मूर्तीच्या शोधात असल्यामुळेच आपल्या मुलाचा खून झालेला आहे. जेलर रजनीकांतची पत्नी त्याची निर्भर्त्सना करते. प्रामाणिकपणा मुलाला शिकवला नसता तर आज त्याचा बळी गेला नसता. तुमच्या या प्रामाणिकपणाच्या संस्कारांमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे, असं ती त्याला ऐकवते.

चित्रपटाची गती हळू असल्याने रजनीकांतचा चित्रपट पाहतोय असं अजिबात वाटत नाही. त्यात रजनीकांतची शांत, संयमित नागरिकाची भूमिका आश्चर्याचा धक्का देते… आणि दरवाजातून फक्त रजनीकांतची पावलं दिसू लागतात. आता चित्रपटाची गती बदलणार, दृश्य बदलणार हे संगीत सांगू लागतं.

जेलरने आता व्हिलन वर्माच्या माणसांना मारायला प्रारंभ केला आहे. मग दिसू लागते त्याचे ते छद्मी हास्य आणि सफाईदारपणे केलेले खून, पण ‘जेलर’ खूप वेगळा असल्याचं जाणवलं. तो या अर्थाने की, रजनीकांत यात दोन रूपात आहे. एक जेलर आणि दुसरा घरचा कर्ता पुरुष, ज्याला त्याच्या कुटुंबाची काळजी आहे, ज्याने मुलगा गमावलेला आहे आणि आता त्याला कोणालाही गमवायचं नाही. या दोन्ही भूमिका रजनीकांत अत्यंत सफाईदारपणे रंगवतो. एरवी रजनीकांतच्या चित्रपटाला जो वेग असतो तसा वेग जरी याला नसला तरी तो इमोशनल करणारा आहे. त्याचा अभिनय भारावून टाकणारा आहे.

‘जेलर’चा जानर विनोदी आहे. गुंडांच्या बॉसचा फोन येतो आणि रजनीकांत फोन उचलतो. बॉस चौकशी करतो की, माझी माणसं कुठे आहेत? तेव्हा रजनीकांत सांगतो की, सगळे बेशुद्ध पडले आहेत. मी पाहिलेला रजनीकांतचा पहिला चित्रपट असेल की, त्यात  रजनीकांतच्या एंट्रीला हाणामारी होते, पण हाणामारी होताना दिसत नाही. बेशुद्ध पडलेले  गुंड दिसतात.  ही एक वेगळी स्टाईल आहे आणि तो एक चांगला प्रयोग आहे.

युद्ध संपणारं नसल्याचं त्याला जेलरला माहीत असतं. युद्धासाठी तयार होताना तो जेलर असताना ज्या-ज्या नामवंत गुंडांना त्याने  प्रेमाने सुधारलेले असतो अशांची तो मदत घेतो. तो म्हणतो, आता जर आपल्याला जगायचं असेल तर या लोकांना मारावंच लागेल आणि हे तेव्हाच संपेल जेव्हा हे सगळे संपतील. तो एक गेम प्लॅन करतो. त्याचा प्लॅन प्रत्येक वेळेस यशस्वी होतो आणि हेच ‘जेलर’चे वैशिष्टय़ आहे.  आता तो रिटायर्ड आहे, पण जेलर असतानाच्या काळात जो विश्वास संपादन केला होता, त्या विश्वासामुळेच जेलरला मदत करणारे अनेक कैदी पुढे येतात.

पाहताना ‘शोले’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गब्बरसिंगचा बदला घेण्यासाठी ठाकूर दोन गुंड… जय आणि वीरू यांची मदत घेतो. कन्सेप्ट थोडी बदललेली असली तरी ‘शोले’चा धागा इथे सापडतो.  यात दोन सुपरस्टार – शिवा राजकुमार आणि मोहनलाल आहे, तर  तिसरा  जॅकी श्रॉफ आहे. शिवाय यातला वर्मा नावाचा व्हिलन खूप मोठा बॉस वाटतंच नाही. अगदी छपरी टाईप दिसतो. त्याची एंट्री बऱयाच उशिराने होते. शेवटचा अर्धा तास मनाचा थरकाप उडवणारा आहे.

याच कथानकासोबत त्यांना एका अत्यंत प्राचीन मंदिरातील मुकुट चोरायचा असतो आणि त्या मंदिरात मुकुटापर्यंत पोहोचण्याकरिता ज्या एका माणसाची सही महत्त्वाची असते तो म्हणजे तिथला एक सिनेस्टार आहे. याचे उपकथानक काय, तर तो सिनेस्टार आहे. तमन्नावर प्रेम करत असतो आणि ती दुसऱया दिग्दर्शकावर प्रेम करत असते.  दोघांच्या प्रेमकहाणीचा एक विनोदी टच या ठिकाणी आलेला आहे. ज्या ‘कावालिया’ गाण्याने व त्यावर केलेल्या तमन्नाच्या  नृत्याच्या रील्सने लाखो लोक पागल झाले ते ‘कावालिया’  या चित्रपटात आपल्याला पूर्णपणे पाहता येत नाही, तर ते तुकडय़ा तुकडय़ात पहावे लागते. कारण मधेमधे अनेक संवाद येतात.

मंदिरातल्या मुकुटचोरीचा एक भाग म्हणून एका हीरोला घेऊन चित्रपट बनवायची कल्पना रजनीकांत मांडतो. त्यात एक गाणं आहे. त्या गाण्यामध्ये नायिकेच्या बाजूला रजनीकांत नाचत असताना हीरो येऊन सांगतो की, या सामान्य माणसाबरोबर माझी नायिका कशी काय नाचते? त्याला लांब उभं करा. तेव्हा त्या दृश्यात रजनीकांतला शेवटी उभं करण्यात येतं. खरं तर या चित्रपटाच्या मागणीनुसार रजनीकांतला या नृत्यामध्ये बरंच दूर उभं करण्यात आलं होतं, पण काही तामीळ मित्रांशी बोलल्यावर कळलं की, तामीळ प्रेक्षकांना ते अजिबात आवडलं नव्हतं. आमच्या सुपरस्टारला इतक्या लांब कसं काय उभं केलं म्हणून तिकडे बरीच आंदोलनं वगैरे झाली. शेवटी रजनीकांतला सांगावं लागलं होतं की, ती दृश्याची गरज होती, पण प्रेक्षकांना त्यांचा थलायवा, त्यांचा नेता मागच्या बाजूला गेलेला मान्य नव्हतं. इतकं प्रेम करणारे प्रेक्षक असतील तर त्या रजनीकांतसारख्या नायकाला किती सांभाळून आपली भूमिका करावी लागत असेल हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.

आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात रजनीकांत सिगारेट वर फेकून ओठात पकडल्याचं पाहिलेलं आहे. यात तो सिगार फेकून ओठात कॅच करतानाचे दृश्य आहे, पण त्याने गॉगल डोळ्यांना लावताना उलटासुलटा फिरवलेला नाही, तर गॉगलऐवजी व्यक्तिरेखेच्या  वयानुसार चष्मा आहे. चष्मा लावण्यापूर्वी संपूर्ण पडदाभर आपल्याला फक्त रजनीकांतचा हात आणि त्या हातामध्ये धरलेला चष्मा दिसतो. एवढंच दृश्य आणि प्रेक्षक टाळ्या वाजवतात. सिगार पेटवताना रजनीकांत माचीसची काडी

बॉक्सवर घासत नाही, तर काडी हातात धरतो आणि बॉक्स त्याच्यावर घासतच असा फेकतो की, दुसरा माणूस तो बॉक्स कॅच करतो तसंच हातातली काडी पेटते आणि त्या काडीने रजनीकांत सिगार पेटवतो.  प्रेक्षकांना हव्या असणाऱया अशा अनेक गोष्टी रजनीकांतने या चित्रपटातही केलेल्या आहेत.

फक्त यातल्या एका दृश्याचा उलगडा होत नाही. मुकुट चोरून घेऊन रजनीकांतची माणसं चालली आहेत आणि रजनीकांतच त्यांच्यावर हल्ला करतो. गाडय़ांचं नुकसान होतं, टायर फुटतात, अनेक माणसं ठार होतात. जेलर नेमकं काय करतोय पाहण्यासाठी व्हिलनची दोन माणसं त्याच्या सोबत असतात. त्यामुळे असा देखावा त्याला करावा लागतो. तो मुकुट त्या माणसांना दिल्यानंतर ती माणसं तो घेऊन जातात आणि त्या क्षणी  मेलेले सर्वजण जिवंत होतात. तो रजनीकांतने लावलेला सापळा असतो. जर या दृश्यात वापरलेल्या सगळ्या बंदुका खोटय़ा होत्या तर टायर कसे फुटतात? गाडीच्या काचा कशा फुटतात? गाडीवर गोळ्यांच्या खुणा कशा पडतात? दोन्ही गोष्टी बॅलन्स होत नाहीत. कारण युद्ध  खोटं होतं. त्यामुळे याचा उलगडा होत नाही. अर्थात रजनीकांतच्या चित्रपटात असे प्रश्न विचारायचे नसतात. त्याकडे दुर्लक्ष करून अॅक्शन दृश्यांची मजा घ्यायची. यात अशी काही दृश्यं आहेत,  जी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आहेत.

‘जेलर’मध्ये तुम्हाला तीन धक्के बसतात. चित्रपटाची मजा जाईल म्हणून मी ते तीन धक्के सांगत नाही. एकंदरीत रजनीकांतच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक जबरदस्त मनोरंजन करणारा आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)