जैन यक्षिणी अंबिका

>> सोनाली शहा

स्त्रीशक्तीचा उत्सव नवरात्र म्हणजे चैतन्याचा आणि शक्तीचा उत्सव. विजयादशमीचा सोहळा या आदिशक्तीच्या विजयाचं प्रतीक म्हणूनच आपण साजरा करतो. आदिशक्तीच्या त्रिगुणात्मक रूपाचं पूजन करताना तिची जैन परंपरेतील वेगळी ओळखही जाणून घेऊया.

प्राचीन हिंदुस्थानी धार्मिक मतांतील एक प्रवाह म्हणजे जैन प्रवाह होय. सृष्टीचा निर्माता म्हणजे ईश्वर, या संकल्पनेला जैन परंपरेत स्थान नाही. या धर्मात मोक्षप्राप्ती झालेल्या तीर्थंकरांना सर्वोच्च स्थान आहे. जैन लोक त्यांची पूजाही करतात. परंतु ऐहिक लाभ मिळवण्यासाठी यक्ष-यक्षिणींची निर्मिती करून इच्छापूर्तीसाठी त्यांना आवाहन केले जाते. सामान्य लोक व तीर्थंकर यामधील दुवा म्हणजेच यक्ष-यक्षिणी होय. प्रत्येक तीर्थंकरासोबत एक यक्ष व एक यक्षिणी कल्पिली गेली. ऋषभ देवाची चव्रेश्वरी, पार्श्वनाथांची पद्मावती, महावीरांची सिद्धयिका व 22 वे तीर्थंकर नेमिनाथ यांची यक्षिणी अंबिका.

उपलब्ध संदर्भानुसार अंबिकेचा प्राचीनतम उल्लेख जिनभद्रगणी क्षमाश्रमण यांचा विशेषावश्यक महाभाष्य तसेच हरिभद्रसुरींच्या आवश्यक निर्युक्ती व ललितविस्तार वरील टीकाग्रंथात अंबापुस्मंडी विद्या असा येतो. शुभचंद्र आचार्यांच्या साहित्यात या देवीच्या नावांची अंबा, तारा, गौरी, वज्रा, आम्रपुष्मंडी अशी विविधता दिसते. तिलोयपण्णत्ती, त्रिषष्ठाrशलाकापुरुषचरित, प्रवचनसारोद्धार, अभिधानचिंतामणी अशा महत्त्वपूर्ण ग्रंथांतून अंबा या नावाने उल्लेख दिसतात. जिनप्रभसुरींनी रचलेल्या श्वेतांबर परंपरेतील अंबिकादेवीकल्पात (14 वे शतक) अंबिका यक्षिणी निर्मितीची कथा मिळते. थोडय़ा फार फरकाने दिसणारी दिगंबर परंपरेत जैनपुण्याश्रवककथाकोषमध्ये सांगितलेली कथासुद्धा रोचक आहे.

अंबा, आम्रपुष्मांडिनी या नावाने ओळखली जाणारी अंबिका सोनेरी रंगाची असून वाहन सिंह असल्याचे जैन परंपरा मानते. भुवनदेव रचित अपराजितपृच्छा, सूत्रधार मंडन रचित रूपमंडन या शिल्पशास्त्राrय ग्रंथांतून अंबिका कधी द्विभुजा, चतुर्भुजा तर कधी अष्टभुजा व विविध हातांत शंख, चक्र, वरदमुद्रा, पाश, धनुष्य, परशू, आंब्याची डहाळी व मांडीवर एक वा दोन शिशू असल्याची वर्णने मिळतात.

पादलिप्त आचार्यांच्या (15वे शतक) निर्वाणकालिका ग्रंथात आंब्याच्या डहाळीचे स्थान मातुलुंग या बीजपूरक फळाने घेतले. तिच्यासोबतची बालके तिचे मातृदेवतेचे महत्त्व स्पष्ट करते. आंब्याची डहाळी समृद्धीचे, सिंहशक्तीचे प्रतीक होय. नेमिनाथांची यक्षी या अनुषंगाने अंबिकेच्या शिरोभागावर नेमिनाथांचे अंकन दिसते.

अंबिका ही साहित्यातील, शिल्पांतील प्रत्येक प्रवाहाची प्रेरणा होती. जैन साहित्यात वारंवार येणारे उल्लेख, हिंदुस्थानात व हिंदुस्थानबाहेरील संग्रहालयातील जैन हस्तलिखितांवरील तिचे अस्तित्व तिची तीर्थकरांच्या खालोखाल असलेली लोकप्रियता दर्शवितात. अंबिका ही चालुक्यांची कुलदेवता होती. महाराष्ट्रातील एक आदिवासी समाज, पारधी समाज विशेषतः खान्देशात आढळतो.

जुनागढची अंबिकादेवी त्यांची पुलदेवता यावरून ते मूळचे गुजरातचे व नंतर महाराष्ट्रात आले असावेत असा अंदाज बांधला जातो. आजही पोरवाल, ओसवाल म्हणजे बहुसंख्य जैन- मारवाडी समाजाची कुलदेवता ही अंबिका आहे. जैन धर्मीय हे मुख्यत्वेकरून व्यापारी होते. समृद्धी, सुफलनासाठी ही पुजली गेली देवता. तिला हीन, शृंगारिक वा बीभत्सपणाचा लवलेशही झालेला नाही.

वेरूळच्या इंद्रसभा लेण्यातील ललितासनातील अंबिकेचे शिल्प सर्वश्रुतच आहे. चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय काळातील मेगुती मंदिरातील शिल्प (आज संग्रहालयात), माऊंट अबूच्या विमलवसही मंदिरातील अंबिकेचे शिल्प दर्शनीय आहे. तामीळनाडूत जिनकांची मठाच्या भित्तिचित्रात चतुर्भुजा अंबिका पद्मासनात विराजमान आहे.

दहाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हिंदुस्थानी मंदिर स्थापत्य बांधणीने वेग घेतला होता. या देवतेच्या शिल्पांचे अंकनही मोठय़ा प्रमाणावर दिसते. या शिल्पांची रचना, हातांची संख्या, तिला दिलेली आयुधे हे घटक तत्कालीन भौतिक, सामाजिक, धार्मिक अन् राजकीय पातळीवर अंबिकेसंबंधित बदललेल्या पण सातत्य दाखवणाऱ्या संकल्पनांची परिणती होय. समकालीन बौद्ध धर्मातील देवता हारिती, शैव पंथातील स्कंदमाता, बहुपुत्रिका यांच्या बरोबर साधर्म्य दर्शवते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या