हिच्चिक! सलग 10 दिवस, 24 तास उचक्यांमुळे या देशाचे राष्ट्रपती हैराण झाले; लवकरच केली जाणार शस्त्रक्रिया

उचकी लागणं ही तशी सामान्य बाब आहे. मात्र उचकी लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागणं ही ऐकायला थोडी विचित्र वाटणारी आणि अशक्य वाटणारी बाब वाटू शकते. मात्र असं प्रत्यक्षात घडत असून ब्राझीलचे राष्ट्रपतची जाईर बोल्सनारो हे सततच्या उचक्यांमुळे त्रासले आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेले 10 दिवस बोल्सनारो हे 24 तास उचक्या देतातयत. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बोल्सनारो यांची दंतशस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतरच त्यांना उचक्यांचा त्रास सुरू झाला आहे.

बोल्सनारो यांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांना उचक्या का येतायत याचं कारण शोधून काढण्यासाठी काही चाचण्या केल्या जाणार आहेत. 2 दिवस त्यांना देखभालीअंतर्गत ठेवण्यात येणार आहे. बोल्सनारो यांनी एका रेडियो वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांना यापूर्वीही असा त्रास झाला होता. औषधांच्या साईड इफेक्टमुळे असं होत असावं असं त्यांना वाटतंय. आपल्याला 24 तास उचक्या लागतात, मंगळवारी उचक्या देऊन-देऊन मी भयंकर थकलो होतो असं बोल्सनारो यांनी म्हटलंय. माझी वाचा बंद झाली असून मी बोलायला लागलो की उचक्या सुरु होतात असंही त्यांनी म्हटलं आहे. बोल्सनारो यांच्यावर 2018 साली चाकू हल्ला करण्यात आला होता. यानंतर त्यांच्यावर बऱ्याच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतरही त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या