जैतापूर संघर्ष पुन्हा पेटणार, फ्रान्सच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

46

सामना ऑनलाईन, मुंबई

कोकणाच्या पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या आणि मच्छीमारांना उद्ध्वस्त करणाऱ्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. त्यामुळे या विनाशकारी प्रकल्पाविरोधात पुन्हा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डबघाईला गेलेल्या ‘अरेवा’ कंपनीने गाशा गुंडाळल्यानंतर हा प्रकल्प उभारण्यासाठी ‘ईडीएफ’ कंपनीने पुढाकार घेतला असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही कंपनी डिसेंबर २०१८पासून कामाला सुरुवात करणार असून २०२७पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

फ्रान्सचे परराष्ट्र सचिव ख्रिश्चन मॅसे आणि फ्रान्सचे हिंदुस्थानातील राजदूत अलेक्झांडर झायग्लेर यांच्यासह ईडीएफच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मागील सात वर्षांत रखडलेला हा प्रकल्प सुरू करण्यासाठी फ्रान्सकडून काय पावले उचलली जाणार आहेत याची माहिती देण्यात आली. डिसेंबर २०१८पासून कामाला सुरुवात होऊन २०२१ला डोमचे (घुमट) काम पूर्ण होऊन २०२७पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. ९९०० मेगावॅटच्या या प्रकल्पात सहा रिऍक्टर उभारले जाणार असल्याचे ऊर्जा सचिक अरविंद सिंह यांनी सांगितले.

जीवघेण्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध – राजन साळवी
स्थानिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आणि कोकणची राख करणाऱ्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध आहे. हा विरोध यापुढेही राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पाला सुरुवातीला विरोध करणाऱ्या भाजपने आता भूमिका कशी बदलली असा सवालही त्यांनी केला. मात्र शिवसेना स्थानिक जनतेसोबत असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. स्थानिकांचा विरोध असताना जर सरकारने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास कामाच्या ठिकाणी मशनरीदेखील आणू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

सायेकर स्मृतीदिनी जैतापूरविरोधी एल्गार
हा प्रकल्प माडबन, राजापूर येथून हटवण्यात यावा यासाठी स्थानिकांनी सुरुवातीपासून अनेक आंदोलने केली होती. यातील मच्छीमारांच्या आंदोलनात १८ एप्रिल २०११ मध्ये साखरीनाटेतील तरबेज सायेकर या युवकाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्याची आठवण म्हणून दरवर्षी १८ एप्रिलला सायेकर स्मृतीदिनी श्रद्धांजली सभा घेण्यात येते. मंगळवारीही ही सभा घेऊन जैतापूरविरोधी एल्गार करण्यात आला. यावेळी आमदार राजन साळवी व जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजीत चव्हाण यांच्यासह स्थानिक जनतेने प्रकल्पाला विरोध करण्याचा पुन्हा एकदा ठाम निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या