जालन्यात जमिनीच्या वादातून 18 वर्षीय भावाने केला 8 वर्षीय सावत्र भावाचा खून

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भार्डी अंबड येथे जमिनीच्या वादातून एका 18 वर्षीय तरुणाने त्याच्या 8 वर्षाच्या सावत्र भावाचा रुमालाने गळा आवळून व नाकातोंडात चिखल कोंबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, भार्डी येथील तुकाराम कुढेकर यांची पहिली पत्नी रेखा ही काही कारणाने पती तुकारामला सोडून गेल्याने तुकाराम कुढेकर याने कावेरी हिच्यासोबत दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा ऋषिकेश (18) हा आई रेखासोबत छत्रपती संभाजीनगर येथे राहत होता तर दुसरी पत्नी कावेरी हिच्यापासून झालेला विराज (8) हा भार्डी येथे आई-वडिलासोबत राहत होता. पहिल्या पत्नीचा पतीसोबत शेती वाटून घेण्यावरून कोर्टात वाद सुरू आहे. तसेच पहिल्या पत्नीचा मुलगा ऋषिकेश हा अधूनमधून गावाकडे येत असे. तो सज्ञान झाल्याने आईच्या सांगण्यावरून वडिलांना जमीन वाटून देण्याविषयी वाद घालत होता.

23 मार्च रोजी गुरुवारी ऋषिकेश याने आपल्या सावत्र लहान विराजला गोडीगुलाबीने डाव्या कालव्याच्या बाजूच्या शेतात नेले. तेथे रुमालाने विराज याचा गळा आवळला. गळा आवळूनही तो मरत नाही असे वाटल्याने त्याने त्याच्या नाकातोंडात चिखल कोंबला स्वास गुदमरून तडफडत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मी माझ्या भावाला शेतात मारून टाकले असे वस्तीवर येऊन सवंगड्याला सांगून व मारल्याचे ठिकाण दाखवून सायकलवरून त्याने पळ काढला. आजूबाजूच्या लोकांना समजल्यावर त्यांनी त्याला पकडून आणले.

घडलेल्या घटनेवरून वरिष्ठांसह गोंदी पोलिसांनी भार्डी येथे धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मयत विराज याची आई कावेरी तुकाराम कुढेकर यांनी गोंदी पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश व त्याची आई रेखा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत विराज याचे पार्थिव अंबड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.