जालन्यात पुन्हा अफूची लागवड उघडकीस, 96 किलो वजनाची लहान-मोठी झाडे जप्त

गांजा, अफु या लागवडीस शासनाने प्रतिबंधित केलेले असतांना जालना जिल्ह्यातील चणेगाव येथे काही मंडळी चक्क अफूची लागवड करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनास मिळाली आहे. बदनापूर पोलीस, गुन्हा शाखा व महसूलच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री सापळा रचून तब्बल 96 किलो वजनाचे लहान-मोठी झाडे ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी चणेगावच्या सरपंचांचे पती निवृत्ती गणेश शेवाळे यास अटक केली आहे. या सर्व झाडांची किंमत 24 लाख 5 हजार रुपये आहे. अफूची शेती सापडल्याने तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.

गांजा, अफू या सारख्या अंमली पदार्थाच्या लागवडीस शासनाने प्रतिबंधित केलेले आहे मात्र बदनापूर तालुक्यातील काही मंडळी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत गांजा,अफू सारख्या अंमली पदार्थांची लागवड करीत असल्याचे दिसून येते. दाभाडी परिसरातीलच चणेगाव शिवारात अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी 4 मार्च रोजी मध्यरात्री चणेगाव येथे जाऊन सापळा रचला. तेव्हा त्यांना चांधईकडे जाणाऱ्या पान्धी कच्च्या रस्त्यालगत असलेल्या गट नंबर 91 मध्ये अफूची झाडे मिळून आली.

पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनखाली बदनापूर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, नायब तहसीलदार संजय शिंदे, सहाय्यक फौजदार इब्राहिम शेख, शिवानंद कालुसे, विष्णू बुणगे, रणजित मोरे, अतिश दासार जालना स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, फौजदार दुर्गेश राजपूत, फुलचंद हजारे, किशोर जाधव, कृष्ण तांगे, प्रशांत लोखंडे, रवी जाधव यांनी ही कारवाई केली

4 तास कारवाई

बदनापूर पोलीस,स्थानिक गुन्हा शाखा व महसुल अधिकार्यांनी 3 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता चणेगाव येथे जाऊन सापळा रचला व पाहणी केली असता त्या ठिकाणी 24 लाख 5 हजार किमतीचे अफू मिळून आले. सदर कारवाई तब्बल 4 तास चालली, मध्यरात्री 1.30 पर्यंत पोलिसांनी अफू झाडे व आरोपीस ताब्यात घेतले व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान 4 मार्च रोजी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या