जळगाव – दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून

1579

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावामध्ये एका 16 वर्षीय मुलाच्या डोळ्यात एका अज्ञात इसमाने काड्या खुपसून तसेच डोक्यावर जड वस्तू मारून खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.

या घटनेची माहिती कळताच यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील राहणारा कैलास चंद्रकांत कोळी (16) हा दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. कैलास गुरुवारी २ एप्रिल पासून घरातून तसेच गावातून बेपत्ता झालेला होता. कुटुंबीय व नातेवाईकांकडुन त्याचा शोध सुरू घेतला जात होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास कोणालातरी तो डांभुर्णी शिवारातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली. हे वृत्त कळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कैलास कोळी याच्या डोळ्यात काडया खुपसून तसेच डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. यावल पोलिसांना घटनेची माहिती समजताच यावल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या