जालन्यातील भोगगावात कोरोनाचा कहर, एकाच कुटुंबातील 11 व्यक्ती पॉझिटिव्ह

604

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे एकाच कुटुंबातील 11 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली असून आरोग्य विभाग गावात ठाण मांडून आहे.

भोगगावातील एका 45 वर्षीय व्यक्तीला लक्षणे दिसून आल्याने शनिवार 1 ऑगस्ट रोजी त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील 21 जणांना घनसावंगीच्या विलगिकरण कक्षात दाखल केले होते. या 21 जणांची तपासणी केली असता बाधित व्यक्तीच्या निकट संपर्कातील त्याची पत्नी, दोन मुले, आई-वडील, भावासह त्याची पत्नी व तीन मुलं असे बाधित व्यक्तीसह एकूण 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. क्वारंटाईन केलेल्या इतर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, भोगगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्यांची गुरुवारी भोगगाव येथेच रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात येत आहेत. गुरुवारी दुपारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांनी भोगगाव येथे भेट देऊन आढावा घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या