बदनापूर – कॉलेजच्या भिंतीवर प्राध्यापकांचे पगारपत्र, संस्थेने लढवली अनोखी शक्कल

1735

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेतंर्गत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्रशासनाने थेट प्राध्यापकांचे वेतन डिस्प्ले बोर्डवर लावले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेत कुतुहल व्यक्त होऊन प्राध्यापकांच्या पगारावर शासन एवढा खर्च करते याबाबत खमंग चर्चा होत असतानाच याचा सकारात्मक परिणाम होऊन विद्यार्थ्यांची हजेरी वाढत असल्याचे चित्र आहे.

बदनापूर येथे निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण देण्यात येते. बदनापूर सारख्या मागासलेल्या तालुक्यात या संस्थेने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक प्रगती केलेली असून येथे पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षणांची संधी या भागात या संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थीभिमुख विविध प्रयोग संस्थाचालक या ठिकाणी करतात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी या महाविद्यालयात अ‍ॅडमिशन मॅनेजमेंट सिस्टीम नावाचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही रांगेत उभे न ताटकळता प्रवेश मिळणे शक्य झालेले आहे. त्याचप्रमाणे एक खिडकी योजना या ठिकाणी चालू करण्यात आली. त्यासाठी एक सॉफ्टवेअर उपलब्ध करून विद्यार्थ्यांना तात्काळ मेसेजद्वारे किती वेळेत त्याचे काम होईल. या बाबत माहिती मिळते. आदी विद्यार्थीभिमुख उपक्रम येथे राबविले जातात.

दरम्यान, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी व विद्यार्थ्यांचा ओढा प्राध्यापक या पदाकडे आकर्षित होण्याच्या दृष्टीने या संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी एक नवीनच प्रयोग केला. त्यांनी या महाविद्यालयात असलेल्या प्राध्यापकांचे मासिक वेतनाचा एक तक्ता तयार करून तो फलेक्सच दर्शनी भागात लावला तसेच या बोर्ड खाली विद्यार्थ्यांनी या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी टीप लावली. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना हा बोर्ड दिसताच अब्बब…! प्राध्यापकांना एवढा पगार असे आश्चर्य व्यक्त होताना दिसत असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या उपस्थिती वाढण्यात होणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

बोर्डवरील प्राध्यापकांचे वेतन बघितल्यावर बदनापूरसारख्या ग्रामीण भागातील नागरिक मात्र नवल व्यक्त करत आहेत. या प्राध्यापकांचे कमीत कमी वेतन 79000 तर जास्तीत जास्त 178680 एवढे वेतन दाखवण्यात आल्यामुळे जनतेच्या करातून एवढे वेतन उच्च शिक्षणासाठी शासन देत असताना हे प्राध्यापक खरोखर त्या दर्जाचे शिक्षण देतात का या बाबत खमंग चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या