जालन्यातील भोकरदन शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवली‌.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या पुत्राने वाहनाने चिरडून चार शेतकऱ्यांची निर्घृण हत्या केली तरी मंत्री पुत्राला अटक झाली नसल्याने तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून महाविकास आघाडीने राज्यभरात आज बंद पुकारला होता.

शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या बंदच्या आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देत बंद यशस्वी पार पाडला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरून मोर्चा काढून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शहरातील रस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेले होते. या मोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद

महाविकास आघाडीच्या बंद आंदोलनातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने चालू होती तर इतर दुकाने दिवसभर कडकडीत बंद दिसून आली.

महाविकास आघाडी व भाजप कार्यकर्ते आमने-सामने

दरम्यान शहरातील महाविकास आघाडीच्या बंद आंदोलनाला प्रतिसाद मिळत होता. यादरम्यान भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांने दुकान बंद करण्यास विरोध दर्शविल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुकान बंद करण्याचे आवाहन केले. परंतु भाजप पदाधिकाऱ्याने दुकान बंद करण्यास नकार दिल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी भाजप कार्यकर्ते तिथे आल्याने महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावेळी शहरात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी घटनास्थळाची परिस्थिती हाताळत तणाव मिटवला. भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष यांचे ते दुकान होते.

आपली प्रतिक्रिया द्या