जालन्यात अवैधरित्या विक्री होणाऱ्या गुटख्यासह 19 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त

जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने माजलगावहून जालना जिल्ह्यातील परतूरकडे अवैधरित्या विक्रीसाठी वाहनात येणारा 11 लाख 66 हजार आणि 8 लाखांचे वाहन, असा एकूण 19 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, एका पांढर्‍या रंगाच्या टाटा इन्ट्रा वाहन क्र. (एमएच-21-बीएच-3475) लोडींग वाहनामध्ये एक व्यक्ती महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला जर्दा अवैधरीत्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी माजलगावकडून परतूरकडे चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार, सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे, पोलिसांचे पथक आणि पंच यांनी आष्टी गावात सापळा रचला त्यावेळी गुटखा घेऊन हे वाहन आष्टी गावाकडून परतूर रोडकडे जाताना परतवाडी तांडा येथील हॉटेल कार्तिकसमोर पोलिसांना पोलिसांनी पाठलाग करून वाहन पकडले. वाहनाचा चालक आणि मालक या दोघांना पोलिसांनी पकडले. शेख आमेर शेख निजाम रा. खतीब मोहल्ला, अंबा रोड परतूर ता. परतूर जिल्हा जालना व मालक मुजाहिद उर्फ मुज्जु गुलाब खान रा. कायमखानी गल्ली, परतूर ता. परतूर जिल्हा जालना अशी या दोघांची नावे त्यांनी सांगितली आहेत.

त्यांच्या ताब्यातील वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता लोडींग वाहनामध्ये 11 लाख 66 हजार 800 रुपये किमतीचा राजनिवास सुगंधीत पान मसाला व जाफराणी जर्दा असा महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला सापडल्याने सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे यांनी पंचासमक्ष 11 लाख 66 हजार 800 रुपये किमतीचा गुटखा व 8 लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण 19 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक कार्यवाही आष्टी पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे पोलीस अंमलदार अंबादास साबळे, गजू भोसले, लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे यांच्यासह चालक सुभाष गावडे यांनी केली आहे.