बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संबध ठेवले, भावाने 11 वेळा चाकू भोसकून विवाहित तरुणाचे जीवन संपवले

25670

बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी अनैतिक संबध ठेवल्याचा राग धरून भावाने एका विवाहित तरुणाचा चाकूने 11 वार करून निर्घृण खून केला. ही घटना 17 मे रोजी रविवारी सायंकाळी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साडेगाव येथे घडली आहे. शिवाजी विश्वनाथ कासार (वय -29, रा. तीर्थपुरी ता. घनसावंगी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विवाहित तरुण शिवाजी विश्वनाथ कासार हा 17 मे रोजी नेहमीप्रमाणे मिस्तरीचे काम करण्यासाठी आपल्या तीर्थपुरीतील सहकाऱ्यासह साडेगाव येथे गेला होता. दुपारपर्यंत साईटवर काम करून दुपारी 3 च्या सुमारास तो साडेगाव येथेच एका लग्नाला गेला होता. सायंकाळी मिस्तरीचे काम संपवूूून शिवाजीचे सहकारी गावाकडे परतले होते. दरम्यान संध्याकाळ झाली तरी शिवाजी गावाकडे आला नसल्याने त्याच्या सहकाऱ्याकडे शिवाजीचा भाऊ ब्रिजेश कासार याने चौकशी केली असता तो दुपारी गावात एका लग्नाला गेला होता, मात्र बांधकाम साईटवर परत आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजीच्या शोधासाठी भाऊ ब्रिजेश हा साडेगाव येथे आला असता त्याला साडेगाव ते इंदलगाव दरम्यान साडेगाव शिवारात गोदावरी नदीकिनारी एका उसाच्या शेतात शिवाजीची मोटरसायकल उभी असल्याची माहिती मिळाली. ब्रिजेश त्या ठिकाणी गेला असता त्याला भाऊ शिवाजी मृतावस्थेत आढळून आला. शिवाजीच्या अंगावर अनेक ठिकाणी धारदार शस्राचे वार केलेले होते. खुनाचा प्रकार घडल्याची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, गोपनीय शाखेचे पो.कों. महेश तोटे, श्रीधर खडेकर, योगेश दाभाडे आदींनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

screenshot_2020-05-18-18-10-13-478_com-google-android-gm

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाचे सूत्र हलवून अवघ्या एका तासात आरोपी आकाश दगडू कांबळे, संदीप ज्ञानदेव कांबळे यांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीविरुद्ध मयत शिवाजी कासार याचा भाऊ ब्रिजेश कासार याच्या फिर्यादीवरून भादंवी कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींना अंबड न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या