22 लाखांच्या बियाण्यांसह गाडीची चोरी, जालना पोलिसांनी 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या

कांद्याच्या बियाण्यासह छोटा हत्ती असा 23 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये मुसक्या आवळल्या. सागरसिंग फट्यांसिग उर्फ सुरजसिंग अंधरिले (रा. गुरुगोविंदनगर, शिकलकरी मोहल्ला, जालना) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

जालना शहरातील घोगरे स्टेडियम समोरील स्वामी समर्थ अर्पाटमेंटच्या पार्किंग गेटचे कुलूप तोडून 9 एप्रिलला पहाटेच्या सुमारास 22 लाख रुपये किंमतीचे कांदा बियाणे व टाटा कंपनीचा छोटा हत्ती असा एकूण 23 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अजालना शहरातील घोगरे यांना ही चोरी रेकॉर्डवरील आरोपी सागरसिंग फट्यांसिग उर्फ सुरजसिंग अंधरिले व त्याच्या इतर साथीदारासह केली, अशी माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यावरून सागरसिंग यास जालना शहरातून ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या इतर साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुंजग, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, सचिन चौधरी, चालक पैठणे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या