जालन्यात पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या पोलीस ठाणे आवारातील वाहनांना आग

जालना शहरातील जुना कदीम पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी जप्त केलेले व विविध गुन्ह्यात पकडून आणलेल्या गाड्यांना आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग अग्निशमक दलाने तात्काळ अटोक्यात आणली.

आज 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजता जुना कदीम पोलीस स्टेशन येथील ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केल्या होत्या त्याच्या बाजूला एक कचराकुंडी होती. त्या कचरा कुंडीला आग लागली. कचरा कुंडीचा लागलेल्या आगीमुळे जवळच पार्क केलेली पहिली गाडीने पेट घेऊन बाकीच्या गाड्यांनीही पेट घेतला, असा प्राथमिक अंदाज दर्शवला जात आहे.

त्याच्याच बाजूला नव्याने जिल्हा वाहतूक शाखा कार्यरत असल्यामुळे तेथील वाहतूक शाखेचे कर्मचारी व कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोमनाथ लामगे, अनिल झिने व फायर कर्मचारी संजय हिरे व सादिक अली,कामल सिंग राजपूत ईतर कर्मचाऱ्यांनी स्वतः आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान, अग्निशमक दलाला फोन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अग्निशमकच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे साधारण दहा-बारा गाड्या आगीपासून वाचविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

आपली प्रतिक्रिया द्या