जालन्यातील तीर्थंपुरी ते मंगरूळ रोडवर भर दुपारी लूटमार

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थंपुरी ते मंगरूळ रस्त्यावर उढाण कंडारी शिवारात डाव्या कालव्याच्या 26 नंबर चारीजवळ मंगळवारी, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास 5 ते 6जणांच्या सशस्त्र टोळीने रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत किमती ऐवज लुटल्याची घटना घडली.

5 ते 6 तरुण रस्त्यावर लूटमार करत असल्याच्या घटनेची माहिती उढाण कंडारीच्या ग्रामस्थांना कळताच त्यांनी तिकडे धाव घेतली तसेच आजूबाजूच्या शेतातील शेतकरीही धावत आल्याने त्या चोरट्यांनी आपल्या दुचाकी सोडून पळ काढला. त्यातील एकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, या चोरट्यांनी रस्त्याने जाणार्‍या मंगरूळ येथील एका तरुणाला जबर मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावला. कंडारी येथील एका दांपत्याला मारहाण करून लुटले. एका ट्रॅक्टरवर मोठाले दगड फेकून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तसेच इतर काही जणांनादेखील अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती बाजूच्या शेतकर्‍यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मरळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी विशाल गोरख तुपारे रा. वारुळा, ता. माजलगाव यास ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. लूटमार करणारे सर्वजण अंबड तालुक्यातील दर्गा शरीफ येथे एका कंदुरीच्या कार्यक्रमाला जात असताना वाटेत त्यांनी हे लूटमारीचा कार्यक्रम केल्याची माहिती मिळाली. दरम्यान, सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अनेक दाम्पत्य अंगावर सोनेणाने घालून लग्न कार्याला दुचाकीने ये-जा करत आहेत. दिवसाढवळ्या भर दुपारी सशस्त्र चोरट्यांचा भररस्त्यावर हैदोस घालून दिसेल त्याला चाकूचा धाक दाखवून लुटमारीच्या या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी सखोल तपास करून सर्व आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.