जालना जिल्ह्यातील राजुर गावाजवळ 9 लाखांचा गुटखा पकडला, तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

278

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजूर गावच्या शिवारातील शेतातील वाड्यात साठा करून ठेवलेला नऊ लाख १८ हजार रूपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. ही कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली. यावेळी एक टेम्पो, दोन दुचाकींसह गुटखा असा एकूण 15 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भोकरदन तालुक्यातील राजूर येथील संदीप भूमकर याच्या शेतातील वाड्यात अवैधरित्या गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी पहाटे शेतातील वाड्यावर कारवाई केली. चौघेजण एका टेम्पोत गुटखा भरत होते. यावेळी पोलिसांनी अण्णा गजानन जगताप, अक्षय पुंडलिक मगरे (दोघे रा. राजूर ता.भोकरदन), मोहंमद तन्वीर अब्दुल खालेद मोमीन, अहमद रझा अशपाक शेख (दोघे रा. जालना) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर शेत व गुटखा संदीप दत्तात्रय भूमकर (रा.राजूर) याचा असल्याचे संबंधितांनी सांगितले.

पोलिसांनी वाहनातील व वाड्यातील असा एकूण 9 लाख 18 हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. गुटख्यासह टेम्पो, दोन दुचाकी असा एकूण 15 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिंह गौर, दुर्गेश राजपूत, सॅम्युअल कांबळे, सचिन चौधरी, हिरामण फलटणकर यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या