जालन्यात बनावट लग्न लावणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, तीन नवरींसह टोळी प्रमुख गजाआड

बनावट लग्न लावणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस जालना येथील चंदनझिरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी एक क्रुझरसह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुजरात येथील पियुष वसंत यांनी जालना येथील चंदनझिरा पोलिस ठाणे येथे तक्रार दिली होती.

पियुष वसंत हे तीन नातेवाईकांच्या लग्नासाठी मुलीच्या शोधात होते. परंतु त्यांना मुली मिळत नसल्याने त्यांनी 2 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील एका पुरुष एजंटला संपर्क साधला. एजंटने त्यांना आमच्याकडे अनाथ घरातील गरीब मुली असल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादीस जालना येथे मुली दाखवतो, परंतु त्यांच्या नातेवाईकांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले.

फिर्यादी नातेवाईकांसह मुली पाहण्यासाठी आला आणि बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे मुली पाहण्याच्या कार्यक्रम झाला. तिन्ही मुलींनी सोनी, राणी, संगिता अशी खोटी नावे सांगितली. मुली पसंद केल्यानंतर एका वकिलामार्फत बॉन्डवरती लग्न लावून देण्यात आले. यानंतर गुजरातला जाण्यासाठी आरोपींनी क्रुझर गाडी करून दिली. त्यांच्यासोबत राहुल नावाचा व्यक्ती नातेवाईक सांगून गाडीत बसला. टोलनाक्यावर नवरी मुलींनी बाथरूमचा बहाणा करून गाडी थांबवली आणि त्यांनी आमचे मोबाईल, खरेदी केलेल्या कपड्यांच्या बॅगा, रोख 30 हजार घेऊन पोबारा केला. फिर्यादीच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक शासमुंदर कौठाळे यांनी उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, विजय साळवे व महिला पोलीस नाईक रेखा वाघमारे यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोधबाबत योग्य त्या सुचना दिल्या. मराठवाडा भागामध्ये खोटे लग्नाचा बनावा करुन नवऱ्या मुलांकडील मंडळीस लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळीची प्रमुख जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील असल्याचे समजले. पोलीस मागावर असल्याचे समजताच ती ठिकाण बदलू लागली.

या दरम्यान, लग्नामध्ये एक बनावट नवरी बनलेली महिला ही जालना येथे शनिमंदीर येथे आल्याचे समजल्यावर तिला ताब्यात घेवून विश्वासाने विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिचे इतर साथीदार यांचे राहण्याचे ठिकाण सांगितल्यावर त्यातील एका महिलेस संभाजीनगर जिल्ह्यातून तर दुसऱ्या महिलेस व टोळी प्रमुख महिलेला बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

फिर्यादी व साक्षीदार यांचा गाडीतून मोबाईल, पैसे व बॅग घेऊन बनावट नवऱ्यांना उतरवून पळवून लावणारा राहुल दिलीप म्हस्के (रा. नागेवाडी) यास नागेवाडी येथील टोलनाका येथून ताब्यात घेण्यात आले. या टोळीच्या ताब्यातून 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील सातेफळ येथील मुख्य आरोपी असलेल्या महिलेवर यापूर्वी देखील जालना, बुलढाणा व संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये याप्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या