शेतकऱ्याच्या मुलाने डॉक्टरकीचे स्वप्न बघूच नये काय? जालन्याच्या डॉ. अजय मोरेची व्यथा

सामना ऑनलाईन । मुंबई 

जालन्याच्या बोलपांगरी गावात शेती करून उदरनिर्वाह करणारे मोरे कुटुंब. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीत काही राम राहिला नाही. पुढच्या पिढीने काही तरी करावे म्हणून अर्जुन मोरे यांनी मुलगा अजयला डॉक्टर करण्याचे स्वप्न बघितले. अजयला आधी एमबीबीएस, नंतर एमडी करावे म्हणून एक एक करून 15 एकर जमीन गहाण ठेवली. एसईबीसी कोट्यातून अजयला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन मिळाले. आता तो मोठा डॉक्टर होणार, आपले कर्ज फिटणार,जमीन सोडवणार अशा आनंदात असलेल्या मोरे कुटुंबाचे स्वप्न न्यायालयाचा निकाल आणि सरकारने प्रवेश रद्द केल्याने भंगले. कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्याच करावी का, शेतकऱ्याच्या मुलांनी डॉक्टरकीचे स्वप्न बघू नये काय, असा सवाल पदव्युत्तर प्रवेश रद्द झालेल्या डॉ. अजय मोरे यांनी केला आहे.

एमबीबीएस केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी डर्माटॉलॉजी विभागातून कराड येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अजय मोरे यांना प्रवेश मिळाला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर आहे. कुटुंबाची सर्व मिळून 17 एकर जमीन. एमबीबीएसला ऍडमिशन घेण्यासाठी त्यातली तीन एकर जमीन बँकेकडे गहाण ठेवली. एमबीबीएसच्या प्रत्येक वर्षाच्या अभ्यासासाठी दरवर्षीचा खर्च मिळून तीस लाखांचे कर्ज अंगावर चढले. आता पुढच्या अभ्यासक्रमाचे काय म्हणून अर्जुन मोरे यांनी पुन्हा बँकेकडे लोन मागितले. पुढील अभ्यासक्रमासाठी बँकेकडून 30 लाखांचे शैक्षणिक कर्ज आवश्यक होते पण बँक लोन द्यायला तयार होईना. उरलेली जमीन बँकेकडे गहाण ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही म्हणून बँकेच्या खेटा सुरू झाल्या. जमिनीवर पीककर्जही असल्याने जमिनीची किंमत कमी ठरत होती. म्हणून हळूहळू करून तब्बल 12 एकर जमीन बँकेकडे गहाण ठेवली. तरीही बँकेने केवळ सात लाखांचे कर्ज मंजूर केले. उर्वरित कर्ज ऍडमिशन झाल्यावर दिले जाईल असे सांगण्यात आले. कराडच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अजय यांना ऍडमिशन मिळाले. सहा दिवस तिथे भरलेही, पण अचानक 2 मे रोजी सरकारच्या निर्णयाने हे ऍडमिशन रद्द झाले. ऍडमिशन रद्द झाल्याचे फोन बोलापांगरी गावातील त्यांच्या घरात खणाणले आणि आईवडील, आजोबा सर्वांचाच धीर सुटला.

हाताशी आता दोन एकरच, भावाच्या शिक्षणाचे काय?
बँकेला गहाण ठेवलेली जमीन वगळता हाताशी आता दोन एकरांचीच जमीन उरली. आधीची जमीन सोडविण्यासाठी आणि बँकेचे कर्ज फेडण्यासाठी डॉ. अजय यांच्यासमोर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. जर सरकारने वटहुकूम काढला नाहीच तर डर्माटॉलॉजी (त्वचाविकारशास्त्र) मध्ये पुढील शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. बँकेच्या कर्जाव्यतिरिक्त ऍडमिशन घेताना पाहुणे-मित्र यांच्याकडून 10 लाखांची मदत जमवली. तीही फेडावीच लागणार आहे. छोटय़ा भावाला ‘बीएमएस’ला ऍडमिशन घ्यायचे आहे. त्यासाठी जुळवाजुळव कशी करायची हे सर्वच प्रश्न मोरे कुटुंबीयांसमोर आवासून उभे राहिले असतानाही डॉ. अजय आपल्याबरोबरच इतरांनाही न्याय मिळावा म्हणून आझाद मैदानात लढा देत आहेत.