कोरोनामुळे जालना जिल्ह्यातील माठ निर्मितीला गेला ‘तडा’

319

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. या उद्योग धंद्यांबरोबर गरीबांचे फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठाला मात्र कोरोनामुळे चांगलाच फटका बसला. सदरील माठ हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जास्त प्रमाणात तयार केले जातात.

कोरोनाच्या संकटात मजूर, हातांवर पोट भरणारे कामगार, हमाल, फिरस्ती लोकांचे हाल होत आहेत. छोटेमोठे व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. उन्हाळ्यात जीवाची लाही होत असताना थंडगार पाणी देणाऱ्या कुंभाराच्या माठालाही कोरोनाने तडा दिला आहे. मातीपासुन बनवलेल्या माठाला उन्हाळ्यात खुप मागणी असते. परंतु लॉकडाऊनमुळे माठ विक्रीच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला असल्याचे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील उत्तम क्षीरसागर या कुंभार बांधवाने सांगितले.

उन्हाळ्यात गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाच्या व्यवसायात लाखांवर उलाढाल होते. परंतु यावर्षी खर्चही निघाला नाही. वडिलोपार्जीत असलेल्या कुंभाराच्या धंद्यात मेहनत जास्त असते. माती, राख, लिद, पाणी, धान्याच्या बनग्या, सरपण, जमवून प्रत्येक माठ चाकावर घडवावा लागतो. याकामी सर्व कुटुंब राबते. अंगमेहनत जास्त असल्याने आजची नवीन पिढी या व्यवसायात उतरायला तयार नाही. त्यामुळे कालांतराने कुंभार व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या