किरकोळ वादातून 8 जणांनी केली वृद्धाची हत्या

555
murder

जालना तालुक्यात रोहनवाडी येथे शुक्रवारी दगडोबा तनपुरे (65) वृद्धाची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. मात्र जोपर्यंत गुन्हा नोंदवला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा वृद्धाच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे दगडोबा तनपुरे यांचा खून केल्याप्रकरणी तनपुरे यांच्याच परिवारातील आठ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तामध्ये रोहनवाडी येथे मृत दगडोबा तनपुरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जालना तालुक्यातील रोहनवाडी येथे दगडोबा तनपुरे आणि त्यांचे नातेवाईक राहतात. दगडोबा आणि त्यांचे पुतणे दोन्ही मुले शिवाजी आणि धीरज यांच्यामध्ये तीन वर्षांपासून शेत जमिनीचा वाद सुरू आहे. काल दिनांक 1 मे रोजी दगडोबा तनपुरे हे गावातच त्यांच्या घराजवळ असलेल्या उकिरड्याजवळ थांबले होते. त्याचवेळी त्यांचे पुतणे शिवाजी तनपुरे आणि धीरज तनपुरे हे देखील उकिरड्याववरून खत काढण्याचे काम करत होते. दगडोबा तनपुरे यांनी या दोघांना त्यांच्या हद्दीत रोवलेले सिमेंटचे खांब दुसरीकडे का टाकले ? असे विचारले. तसेच याबाबत सरपंचाकडे तक्रार करण्यासाठी ते जात होते. त्याच वेळी शिवाजी आणि धीरज या दोघांनी दगडोबा तनपुरे यांना लोखंडी पाईप, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये दगडोबा हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ही माहिती दगडूबा तनपुरे यांचा मुलगा सोनाजी हा खरपुडी येथे काम करत असताना त्याला समजली. त्यानंतर त्याने जालना सामान्य रुग्णालय गाठले. त्यावेळी शवविच्छेदन कक्षामध्ये आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर वडिलांची हत्या करण्यात आली असल्याची शंका त्याला आली. त्यामुळे जो पर्यंत वडिलांची हत्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्याने नकार दिला. शेवटी रात्री उशिरा तालुका जालना पोलीस ठाण्यात दगडोबा तनपुरे यांची हत्या केल्याप्रकरणी शिवाजी अण्णासाहेब तनपुरे, धीरज तनपुरे, सुनील शिवाजी तनपुरे, अनिल शिवाजी तनपुरे, स्वप्निल शिवाजी तनपुरे, मथुरा अण्णासाहेब तनपुरे, जिजाबाई शिवाजी तनपुरे, धीरज तनपुरे, उषा धीरज या आठ जणांविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रात्री मोठा फौजफाटा रोहनवाडी येथे पाठवून दगडोबा तनपुरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या