जालना शहरातील सिंदखेड राजा चौफुली वन विभागाच्या उद्यानासमोर सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 17 प्रवाशी जखमी झाले, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पंचवटी आगाराची एसटी सिंदखेडराजाहून नाशिककडे जात असताता सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात नाव्हा रोडवर अपघात झाला. सदर अपघात आज (4 जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. बस चालक अंकुश आव्हाड यांनी इमर्जन्सी ब्रेक लावले असता बस स्लीप होऊन ट्रकवर जाऊन धडकली आणि मोठा अपघात झाला. जखमींना तात्काल स्थानिकांच्या मदतीने शहरातील शासकीय सामन्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या भीषण अपघातात चार प्रवाशांच्या डोक्याला मार लागला असून 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त एसटी आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी सुरुळीत सुरू केला आहे. “जखमींवर सिटीस्कॅन आणि एक्स-रे करून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.” अशी माहिती शासकीय सामान्य रूग्णालयाचे आतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेन्द्र गाडेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.