जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा रोडवरील वाडी गणपती मंदिराजवळ भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना चिरडल्याची घटना आज 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. शंकर सिताराम चोरमारे (24), ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे (28) असे मृतांचे नावे आहेत तर लक्ष्मण चव्हाण हे गंभीर जखमी आहेत.
गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शंकर सिताराम चोरमारे, ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि लक्ष्मण चव्हाण हे तिघे जण भोकरदन आन्वा रोडवर वाडी शिवारातील घरासमोर बसले होते. याच दरम्यान आन्वा गावाकडून भोकरदनकडे भरधाव वेगाने आलेल्या कारने घरासमोर बसलेल्या तिघांच्या अंगावर गाडी घातली. गाडीने जवळपास 100 फुट त्यांना फरफटत नेले. या भीषण अपघातात शंकर चोरमारे याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले जयकुमार शरद देशभ्रतार असे गाडी चालकाचे नाव आहे. कार जळगाव येथून लातूरकडे दोघांना घेऊन मधल्या मार्गे जात होती. अपघातानंतर कार चालकाने कार जागेवर उभी केली. सध्या चालक पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.