जालन्यात शेतकऱ्यांवर संकट, आठवडी बाजारात वांगी रस्त्यावर फेकली

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई आठवडी बाजारात वांग्यांना केवळ एक रुपये किलो भाव मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी वांगी रस्त्यावर फेकून दिली.

पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवार आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली. बाजारात वांग्याची आवक जास्त असतानाच घेणारे कमी असल्याने भाव एक रुपया किलोवर आले. यामुळे शेतकर्‍यांनी तोडणी वाहतुकीचा खर्चही निघणार नसल्याने संतप्त शेतकर्‍याने वांगी रस्त्यावर फेकून दिली. मागील आठवड्यात टोमॅटोला भाव नसल्यामुळे शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले होते. भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.

गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी शेतकर्‍यांना भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, मेथी तर भाजीपाल्यांना भावच मिळत नसल्याने आठवडी बाजारात भाजी विक्रीसाठी घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांना नशिबी निराशा येत आहे. मोठ्या अपेक्षेने शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेले भाजीपाल्यास भाव नसल्याने शेतकर्‍यास नाराजीचे वातावरण आहे. कापूस सोयाबीन हरभरा शेतमालाच भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.

भाव मिळत नसल्याने वांगी फेकली. एक एकर वांगी लागवड केली होती मंगळवार आठवडी बाजार असल्याने सोमवारी आम्ही पाच रोजंदारीने मंजूर लावून वांगी तोडणी केली होती. एक रुपया किलो भाव असल्याने मी जवळपास दोन क्विंटल वांगे बाजारामध्ये फेकून दिले असल्याची माहिती पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी रामेश्वर देशमुख यांनी सांगितले.