जलयुक्त शिवार अभियानाचा बोजवारा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा संभाजीनगर जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झालेल्या गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होऊ शकलेली नाही. उलट जलयुक्तची कामे झालेल्या गावांपैकी ५८ गावांतील जनतेची तहान आजही टँकर्सवर भागवावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या २०६ टँकर्स सुरू असून, १८३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

राज्य शासनाने २०१४ मध्ये मराठवाडा विभागासाह राज्यात जलयुक्त शिवार अभियानास सुरâवात केली. दरवर्षी जानेवारी महिन्यात गावांची निवड करून वर्षभरात कामे पूर्ण करायची, असे धोरण ठरविण्यात आले. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षासाठी २२८ गावांची, २०१६ – १७ या वर्षांत २२३ आणि चालू वर्षात १९३ गावांची निवड करण्यात आली आहे. अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये सिमेंट बंधारे,

नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरण यासह विविध कामे करण्यात आली, तसा दावाही प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. यासाठी लोकसहभागही नोंदविण्यात आला. या कामात काही स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पावसाचे पाणी शिवारात अडवणे व शिवारातच जिरवणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शासनाने या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. शिवाय यासाठी लोकसहभागही नोंदविण्यात आला, मात्र संभाजीनगरजिल्ह्यात जलयुक्तची कामे समाधानकारक झाली नाहीत, हेच सध्या सुरू असलेल्या टँकर्सवरून स्पष्ट होते. या जिल्ह्यात श्रम, निधी पाण्यात गेला असेच म्हणावे लागत आहे. कारण ज्या-ज्या गावांत जलयुक्तची कामे झालेली आहेत, अशा काही गावांपैकी ५८ गावांत आजही टँकर्सने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

जिल्ह्यात पहिल्या वर्षी जलयुक्तचे अभियान राबविताना गावांची निवड, कामांची निवड, आराखडा, आराखड्यास मान्यता, निविदा आदी सर्व प्रक्रिया करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागला. गावांची निवड करताना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांची प्राधान्यक्रमाने यासाठी निवड करण्यात आली. तेथील पाणी टंचाई दूर व्हावी, टँकर्स बंद व्हावे, पाण्याचा स्त्रोत वाढावा हा त्यामागचा मुख्या उद्देश होता. प्रथम दीड वर्षांत ही कामे पूर्ण करण्यात आली. या कामानंतर गावांतील पाणीटंचाई संपेल, गाव जलयुक्त होईल अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा फोल ठरली आहे. प्रशासनास टँकर्सने पाणीपुरवाठा करावा लागत आहे.

प्रत्यक्षात आज दोन वर्षांनंतरही जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, सिल्लोड, रत्नपूर या तालुक्यांतील जलयुक्तमध्ये निवडलेल्या गावांमध्येच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दोन वर्षात ज्या – ज्या गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झालेली आहेत, त्यापैकी काही गावांतील टंचाई अद्याप दूर झालेली नाही. अशा ५८ गावांत टँकर्स सुरू आहेत. त्यामुळे जलयुक्तच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मार्च महिन्यातच जिल्ह्यतील १६९ गावे टंचाईग्रस्त असून या गावांना २०६ टँकर्सने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाने १८३ खासगी विहीरींचे अधिग्रहण केले आहे. एवूâणच पाणीटंचाईची समस्या दूर व्हावी, गावे टँकरमुक्त होण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्यात एक प्रकारे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाचा कोट्यवधींचा निधी ‘पाण्यात’ असेच म्हणावे लागत आहे. यापुढे तरी जलयुक्त शिवारची कामे दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या