जांबुवंतराव धोटे

141

यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात ‘विदर्भसिंह’ जांबुवंतराव बापूराव धोटे यांचे शनिवारी वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. जांबुवंतराव म्हणजे अद्भुत रसायन. अफाट व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेला हा माणूस जातीवंत लढवय्या होता. जांबुवंतरावांना राजकारणी म्हणावे, पत्रकार म्हणावे, लढवय्या क्रांतिकारक म्हणावे, विद्रोही म्हणावे, अगदी नट आणि चित्रपट निर्माताही म्हणावे. तरी सर्वांना पुरून उरावे आणि उसळून यावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व! त्यांचे भाषण म्हणजे अंगार ओकणे, शब्द म्हणजे धगधगते निखारे. एका भाषणाने लाखोंचा जनसमुदाय अगदी पेटवून सोडणारा हा नेता अचानक यापुढे जाहीर सभेत भाषण करणार नाही असे जाहीर करून टाकतो.

आयुष्यात प्रचंड विरोधाभास घेऊन जगणारा हा अवलिया. वैदिक परंपरा मान्य नाही म्हणून आकाशाखाली समुद्राच्या साक्षीने रामराव आदिकांच्या मुलीशी विजयाबाईंशी विवाह करणाऱया या लढवय्या नेत्याने मुलींची नावे ‘क्रांती’ आणि ‘ज्वाला’ अशी ठेवली तरी हळव्या बापाचे कर्तव्य निभावत क्रांतीचा विवाह मात्र वैदिक पद्धतीने केला. विदर्भात 15 ते 20 आमदार स्वतःच्या बळावर निवडून आणण्याची ताकद राखणारा हा नेता मी स्वतःच अलिप्त झालो असे म्हणत कधीतरी स्वतःचा दारुण पराभवसुद्धा होऊ देतो. पाच वेळा विधानसभा, दोन वेळा लोकसभा जिंकणारा हा नेता केवळ 500 मतांनी लोकसभा हरतो तेव्हा चक्क आमदारकीचाही राजीनामा देऊन टाकतो, असा हा सारा लहरी कारभार! दिवंगत विधानसभाध्यक्ष बाळासाहेब भारदेंना पेपरवेट फेकून मारल्याप्रकरणी आमदारकी रद्द झाल्यानंतर पोटनिवडणुकीत लोकांनी त्यांना पुन्हा निवडून त्याच विधानसभेत पाठवले. यशवंतरावांसारख्या आदर्श नेत्याने जांबुवंतरावांच्या पराभवासाठी किती जंग जंग पछाडले, सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. तुरुंगात असलेल्या जांबुवंतरावांच्या केवळ गजाआडच्या छायाचित्रांनी त्यांना निवडून आणले, हा अविस्मरणीय इतिहास केवळ तेच घडवू जाणे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात पंडित नेहरूंना मोटारीतून खाली उतरवणारे हेच जांबुवंतराव पुढे काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. कृषी विद्यापीठाच्या आंदोलनात त्यांचे पाच सहकारी शहीद झाले तेव्हा ‘शहीदच व्हायचे असेल तर स्वतंत्र विदर्भासाठी का नको’ असे म्हणत तेव्हापासून ते पूर्णपणे स्वतंत्र विदर्भवादी झाले.

गरीबांच्या संसाराची होळी करून मराठवाडय़ात नामांतर लादू नका अशी मागणी करून त्यांनी स्वभावाप्रमाणे रोषही ओढवून घेतला होता. प्रत्येक पदयात्रेला आरंभापासून शेवटपर्यंत पायी चालत जात म्हणूनच त्यांच्या एका शब्दाखातर लाखो लोक आंदोलनात उतरायचे. राजकारणाचा प्रारंभ करताना जवाहर दर्डांसारख्या काँग्रेस नेत्याला नगरसेवकपदाच्या निवडणुकीत धूळ चारल्याचा त्यांचा राजकीय इतिहास अविस्मरणीय ठरला. इंदिरा लाट असतानाही खासदार म्हणून निवडून आलेल्या जांबुवंतरावांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आक्रमक आदर्श आपल्या डोळ्यांपुढे ठेवलेला होता. त्यांचे निवडणूक चिन्ह हे प्राधान्याने सिंह हेच असायचे. नेताजींच्या फॉरवर्ड ब्लॉकपासून राजकारणात आलेले जांबुवंतराव काँगेस, शिवसेना, विदर्भ जनता काँग्रेस, प्रणव मुखर्जींचा गट, चंद्रशेखरांचा पक्ष अशा कितीतरी पक्षसंघटना फिरून शेवटी पुन्हा फॉरवर्ड ब्लॉकमध्ये परतले. त्यांची एकूण राजकीय कारकीर्द ही तब्बल 58 वर्षांची आहे. तरुण वयात ‘जागो’ नावाच्या चित्रपटातील हा हीरो वयाच्या 83व्या वर्षीसुद्धा हा नेता तरुणांच्या गळ्यातील ताईतच होता. स्वतंत्र विदर्भ अस्तित्वात आल्याशिवाय माझी इहलोकीची यात्रा संपणार नाही असे ते नेहमी म्हणत, ज्वालामुखी वाणी आणि सिंहाचे हृदय असलेल्या या विदर्भवीराचा मृत्यू स्वतंत्र विदर्भवाद्यांबरोबरच इतरांनीही चटका लावणारा ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या