प्रेक्षकांशी ‘बॉण्ड’ केलेला अभिनेता

33

>> समीर गायकवाड

चित्रपटात काम करणारा रॉजर मूर जरी गेला असला तरी त्याने प्रेक्षकांशी केलेल्या ‘बॉण्ड’चे नाते कधीही तुटणार नाही हे कोणताही सिनेरसिक छातीठोकपणे सांगेल हीच सर रॉजर मूर यांची खरी कमाई! बॉण्डपटाचा बेताज बादशहा रॉजर मूर यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख.

चित्रपटात काम करणारी स्टार मंडळीही हाडामांसाची माणसंच असतात. एकेदिवशी तेही आपली साथ सोडून आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून जातात. चाहते मंडळी आपला शोक प्रकट करतात, त्यांचे स्नेहीजन जुन्या आठवणींना उजाळा देतात तर आप्तेष्ट लोक दुःखात बुडून जातात. पण सामान्य माणूस या सर्वांपासून अलिप्त असतो. पण रसिक माणूस मात्र दीर्घकाळ हळहळ व्यक्त करत राहतो. कोण कुठला सातासमुद्रापारचा एका विशिष्ट पठडीतील भूमिका करणारा वृद्धत्वाला टेकलेला एक अभिनेता आपली एक्झिट घेतो आणि अख्ख्या जगाने सुस्कारे सोडले असं सहसा होत नाही. पण कालपरवा असं घडलं. कारण बॉण्डपटाचा बेताज बादशहा रॉजर मूरचा लोकांशी असणारा ‘बॉण्ड’च तितका घट्ट होता.

आजही बॉण्डपट पहिले जातात. त्यातली मेन थीम आजही तशीच आहेत. त्यातली टायटल्सदेखील तशीच आहेत. बॉण्डपटात सुरुवातीला रुपेरी पडद्यावर कॅमेऱयाच्या शटरच्या कप्प्यांचे रेखाटन समोर यायचे. त्यातल्या गोलाकार लेन्सच्या कप्प्यातून बॉण्डची सावली पुढे जायची. जोडीला साऊंंड ट्रकवर बॉण्डची चिरपरिचित सिग्नेचर टय़ून चढत्या टोनमध्ये घुमायची. इकडे तिकडे बघत जाणारी ती सावली अचानक प्रेक्षकांच्या दिशेने वळायची आणि सफाईदारपणे तो हातातले रिव्हॉल्व्हर चालवायचा. पडद्यावरील त्या गोलातून रक्त ओघळू लागायचे. मग पडद्यावर टायटल चमकायचे. अल्बर्ट ब्रोकोली प्रेझेंट्स इयान फ्लेमिंग्ज एबीसी… ‘पुढचे दोन तास बॉण्ड आणि त्याच्या सुंदरींनी पब्लिकचा ताबा घेतलेला असे. बॉण्डपटाचे अनेक बिंदू आहेत, पण रॉजर मूर त्यातला केंद्रबिंदू ठरावा इतका सरस होता…

बॉण्ड म्हटलं की काही गोष्टी आपसूक डोळ्य़ांपुढे तरळतात. जगभरातील प्रेक्षणीय व निसर्गरम्य स्थळं, बॉण्डची स्पेशल एजंट क्यू आणि त्यांच्या सहकाऱयांनी बनवलेली एकाहून एक सरस गॅजेटस्, तोंडात बोटं घालायला लावणारी त्याची ऍस्टन मार्टिन कार, थंड डोक्याचा बॉण्ड आणि त्याच्याभोवतीचा अल्पवस्त्रातील लावण्यवतींचा गराडा! बॉण्डचा जन्मदाता लेखक इयान फ्लेमिंगलाही हे पात्र इतकं अजरामर ठरेल असं कधीच वाटलं नव्हतं. फ्लेमिंग एक जाणकार पक्षी निरीक्षक होता व ‘जेम्स बॉण्ड’ हे नावही त्याने एका तत्कालीन विख्यात अमेरिकन पक्षी निरीक्षकापासून प्रेरित होऊन घेतलं होतं.

शॉन कॉनरीने अचानक कॉनरीने बॉण्डच्या भूमिका बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओरिजिनचा अभिनेता जॉर्ज लाझेंबी हा नव्या बॉण्डच्या रूपाने समोर आला. बॉण्ड साकारण्यासाठीचे सकल गुण त्याच्या अंगी होते. १९६९ मध्ये ‘ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस’या चित्रपटाच्या यशामुळे जॉर्जचे दिग्दर्शकाशी खटकले. त्यामुळे बॉण्डपटापासून तो बाजूला झाला. पुन्हा नव्याने बॉण्डचा शोध सुरू झाला, मात्र अखेरीस शॉननेच पुन्हा एकदा बॉण्ड साकारला. १९७१ मध्ये ‘डायमंडस् आर फॉरएव्हर’मध्ये त्याने बॉण्डची लास्ट इनिंग खेळली. तोवर ‘डबल ओ सेव्हन’ची नशा त्याने लोकांत भिनवली होती. एम, मिस मनीपेनी, क्यू या इतर पात्रांची लोकांशी घसट झाली!

यानंतर आला तो रॉजर मूर. सोनेरी केसांचा, निळ्य़ा डोळ्य़ांचा, बेरकी चेहऱयाचा, शिडशिडीत बांध्याचा, चपळ अंगाचा, तल्लख बुद्धीचा, मधूनच कमालीचा लफडेबाज वाटणारा, आपल्या अस्मानी मोहिमा तडीस नेणारा, आतल्या गाठीचा रॉजर मूर अनेकांना शॉन कॉनरीपेक्षा उजवा वाटायचा. त्याचे ते निमिषार्धात पिस्तूल काढून रोखणं अन् हलकेच पोरींचे थवे उडवणे जाम भारी वाटायचे. कधी मिश्कीलपणे हसत तर कधी नजर चुकवत चुकवत गालफाडे आत घेत ‘माय नेम इज बॉण्ड, जेम्स बॉण्ड’ असं म्हणत हस्तांदोलन करणारा आणि त्याचवेळी उडत्या पाखरांची पिसं मोजणारा हा माणूस अवलिया वाटायचा. आपलं ड्रिंक्सदेखील तो विशिष्ट लकबित ऑर्डर करायचा, ‘व्होडका मार्टिनी, शेकन, बट नॉट स्टर्ड!’ असा हा धडाकेबाज बॉण्ड. त्याने सर्वात जास्त म्हणजे सात चित्रपटांमध्ये जेम्स बॉण्डची भूमिका केली. १९७३ मध्ये जेव्हा त्याने पहिला चित्रपट केला तेव्हा त्याचे वय ४६ वर्षे होते आणि १९८५ मध्ये वयाच्या ५८व्या वर्षी त्याने शेवटचा बॉण्ड साकारला. त्याच्या सर्व कथानायकात काही मजेदार वैशिष्टय़े होती. शॉन कॉनरी जसा जुना होत गेला तसा बॉण्डपटाचा प्रेक्षक विस्तारत गेला, त्याच्या आवडीनिवडी बदलत गेल्या. ‘प्लेबॉय’ इमेजचा हलक्या फुलक्या मूडमधला, मादक चेहऱयाचा आणि लफडी कुलंगडी करत करत शत्रूचा बीमोड करणारा स्पाय एजंट लोकांना हवा होता तो रॉजर मूरने दिला. यामुळेच ऍकॅडमी ऍवॉर्डस्च्या पोलमध्ये २००४ साली सर्वश्रेष्ठ बॉण्ड साकारणारा कलाकार म्हणून त्याची निवड झाली शिवाय २००८ च्या अन्य एका पोलमध्येही त्यानेच सर्वाधिक म्हणजे ६२ टक्के मते घेतली होती.

१९७३ च्या ‘लिव्ह ऍण्ड लेट डाय’ या चित्रपटासाठी रॉजरने आपले केस कापले होते. वेट लॉस केले होते. त्यानंतर त्याने ‘द मॅन विथ द गोल्डन गन’, ‘द स्पाय हू लव्हड मी’, ‘मुनरेकर’, ‘फॉर युवर आइज ओन्ली’, ‘ऑक्टोपसी’ आणि ‘अ ह्यू टू किल’ या चित्रपटांमध्ये काम केले. इतके असूनही स्वतः रॉजरने’ माय वर्ड इज माय बॉण्ड’ या आत्मचरित्रात आपल्या अभिनयावर तृप्त नसल्याचे म्हटलेय. रॉजरने साकारलेल्या भूमिकांचे वैशिष्टय़ म्हणजे खटकेबाज संवाद, मिश्कील आणि तडफदार दोन्हीही संवाद तो लीलया स्टाइलमध्ये बोलायचा. त्याची उजव्या बाजूला किंचित झुकून वेगाने चालत जाण्याची ढब, मादक हसीनांच्या गराडय़ात असूनही भेदक नजरेने आपले लक्ष्य हेरायची ससाण्यासारखी देहबोली, त्याचे विशिष्ट लकबीतले सिगारेट फुंकणे, मधूनच डोळे मिचकावणे, हाणामारी करताना कोटय़ा करणे, त्याचा देखणेपणा, त्याची तडफ, त्याचे सहज वावरणे सगळे गजब होते. प्रसंगी कठोर होणारा अन् सौंदर्यवती ललनेस निर्दयी होत यमसदनास धाडणारा मूरचा बॉण्ड सर्वांना हवाहवासा वाटायचा. हिंदुस्थानी प्रेक्षक तर त्याची ‘ऑक्टोपसी’मधली कबीर बेदीसोबतची जुगलबंदी कधीच विसरणार नाहीत. वयाची साठी गाठूनही त्याने ‘अ ह्यू टू अ किल’ केला होता तेव्हा चार्म जाऊनही लोकांनी तिकीटबारीवर रांगा लावल्या होत्या. ही त्याची जादू होती. पण यानंतर त्याने स्वतःला आवरते घेतले. कारण लोकांची अपेक्षा असायची की बॉण्ड नेहमीच सदाबहार तरुण, गिर्रेबाज आणि धाडसी तडफदार असावा!

बॉण्ड सीरिजचा २३वा चित्रपट ‘स्कायफॉल’ येऊन गेल्यानंतर पुढील आघाडीवर सध्या तरी सामसूम दिसत असतानाच रॉजर मूरच्या निधनाची बातमी आली आणि सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. आताच्या बलदंड आणि काहीशा एकसुरी नायकांच्या जमान्यात रॉजरचे वेगळेपण लगेच नजरेत भरते. शेकडो माणसात वावरत आपली हेराची ओळख एक्स्पोज करूनही आपली हेरगिरी पार पाडणारा माणूस हेर कसा काय असू शकतो याचे त्याने उत्तर दिले होते. १९८० च्या ‘सी वुल्वज’ या गोव्यात चित्रीकरण झालेल्या चित्रपटामुळे रॉजर गोव्यातल्या लोकमानसात चांगलाच रुजला होता. १९४९ ते २०११ अशा ६२ वर्षांच्या कालखंडात रॉजर मूरने ६३ चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून काम केले. दॅट लकी टच (१९७५), वाईल्ड गीज (१९७८), कर्स ऑफ दी पिंक पँथर (१९८३), दी नेकेड फेस (१९८४), दी एनिमी (२००१) हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. २०११ साली प्रदर्शित झालेला ‘अ प्रिन्सेस फॉर क्रिसमस’हा त्याचा शेवटचा चित्रपट. १९९१ मध्ये युनीसेफने त्याला आपला सदिच्छा राजदूत म्हणून नियुक्त केले होते.

सुप्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न ही मूरची खास मैत्रीण. तिच्याच आग्रहावरून मूर युनीसेफशी जोडला होता. अनेक सौंदर्यवती मदनिका मूरच्या आयुष्यात आल्या.

रॉजर मूर त्याच्या भूमिकाप्रमाणेच रिअल लाइफमध्येही लढवय्या होता. १९९३ मध्ये त्याच्या प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले. त्याची सर्जरी झाली. त्यातून तो सावरला असे वाटत असतानाच २००३ मध्ये ब्रॉण्डवेवर स्टेजवर असतानाच तो कोसळला. यावेळी त्याच्या हृदयाने घात केला होता. त्याला पेसमेकर बसवले गेले. २०१२ मध्ये त्वचेच्या कॅन्सरचे निदान झाले तरी तो लढत होता. २०१३ मध्ये त्याच्या मधुमेहाचे निदान झाले आणि त्याच्या आवडत्या मद्यपानावर बंदी आली. दरम्यान, १४ जून २००३ ला त्याला सर किताब देणारा हॉनर ब्रिटिश साम्राज्याकडून बहाल करण्यात आला होता. रॉजरला तीन अपत्ये आहेत. बॉण्डपटांना ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याने लिहिलेले ‘बॉण्ड ऑन बॉण्ड’ हे पुस्तक खूप बोलके होते. २३ मे रोजी त्याचे निधन होण्याआधी दोन आठवडे त्याने आणखी एक आत्मकथन लिहून दिल्याचे त्याच्या प्रकाशकांनी बुधवारी सांगितलेय. या पुस्तकात त्याने अनेक सत्य उघडकीस आणताना आपण किती मिसफिट होतो व काही अंशी अपात्र होतो हे सांगतानाच बॉण्डपटातील किश्श्यांपासून ते हॉलीवूडमधील रंजक गोष्टींचा त्याच्या शैलीत ऊहापोह केला आहे असे बोलले जातेय.

रॉजर मूर जरी गेला असला तरी त्याने प्रेक्षकांशी केलेल्या ‘बॉण्ड’चे नाते कधीही तुटणार नाही हे कोणताही सिनेरसिक छातीठोकपणे सांगेल हीच सर रॉजर मूर यांची खरी कमाई!!
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या