श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

कश्मीरमधील श्रीनगर येथे बुधवारी सकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करून हल्ला केला. दहशतवाद्यांचा हा हल्ला हिंदुस्थानच्या जाबांज जवानांनी परतवून लावला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला हिंदुस्थानी जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी उडालेल्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला, तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. रमेश रंजन असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून बिहारमधील अरा जिल्ह्यातील रहिवासी होता.

श्रीनगरच्या बारमुल्ला हायवेजवळील नारबल नाक्यावर बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास तीन दहशतवाद्यांनी स्कुटीवर येऊन ‘सीआरपीएफ’च्या चेकपोस्टवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी ताबडतोब या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीदरम्यान स्कुटीवरून आलेल्या तीनपैकी दोन दहशतवाद्यांचा जागीच खात्मा करण्यात आला, तर तिसरा दहशतवादी जखमी अवस्थेमध्ये जंगलाकडे पळाला.

जखमी दहशतवाद्याचा शोध घेण्यासाठी जंगलात शोधमोहीम राबवल्यानंतर त्याला जिवंत पकडण्यात सीआरपीएफच्या जवानांना यश आले. त्याला शेरे कश्मीर आयुर्विज्ञान संस्थान येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, चकमकीत मारले गेलेले दहशतवादी हे इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-कश्मीर (ISJK) या संघटनेचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खतिब उल दास, जियाउल रहमान आणि उमर फैयाज असे खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून दहशतवादी साहित्य आणि हत्यारं जप्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या