
जम्मू कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह पाच दिवसांनी सापडला आहे. प्रदीप सिंह हा 27 वर्षांचा लष्करातील जवान 13 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. सोमवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे अनंतनाग येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या 4 झाली आहे. कोकेरनाग येथे दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत प्रदीप सिंग सहभागी होते. जम्मू कश्मीरमध्ये मंगळवारीही लष्कराची शोधमोहीम सुरू आहे.
लष्कराचे जवान आणि जम्मू कश्मीर पोलीस घनदाट जंगालात शोध मोहीम राबवत आहेत. अनंतनाग येथील चकमकीत शहीद झालेले जवान 19 राष्ट्रीय रायफलमध्ये सहभागी होते. कमांडिंग ऑफीसर कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष ढोंचक, डीएसपी हुमांयू मुजम्मिल भट्ट हे चकमीत शहीद झाले होते. तर प्रदीप सिंग बेपत्ता होते. आता त्यांचा मृतदेह सापडला आहे. शोध महीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल लष्कराने कारवाई केली. या चकमकीत ते शहीद झाले आहेत.
प्रदीप सिंह पंजाबच्या पटियाला येथील रहिसावी होते. त्यांच्या पश्चात्य पत्नी आहे. प्रदीप सिंह क्विक रिअॅक्शन पथकात होते. चकमकीच्या पहिल्या दिवशी दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाल्याची शक्यता आहे. प्रदीप सिंह यांच्यासह दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. ते दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत पृष्टी करण्यात आलेली नाही.
या शोधमोहिमेदरम्यान इस्रायलचे हेरोन एमके II यूएवी, क्वाडकॉप्टर, नाइट विजन डिवाइस आणि विशेष टेहळणी साधने तैनात करण्यात आली आहेत. या भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आल्याचे जम्मू कश्मीर पोलिसांनी सांगितले. जम्मू कश्मीरमध्ये गेल्या 10 दिवसात घुसखोरीच्या 5 घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे लष्कराने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिमेला गती दिली आहे.