स्वाभिमानाचा शिरच्छेद

81

पाकिस्तानच्या सापळ्यात आम्ही फसलो आहोत. जगातले किती देश या प्रश्नी आमच्या बाजूने उभे आहेत ते पंतप्रधानांनी जाहीर करावे. काँग्रेस राजवटीत जवानांच्या शिरच्छेदाचे प्रकार झाले तेव्हा एका जवानाच्या बदल्यात पाकड्यांची दहा मुंडकी कापून आणू अशा वीर गर्जना करणाऱ्यांचे राज्य दिल्लीत आहे; पण पाकड्यांकडून आमच्या जवानांचा आणि स्वाभिमानाचा शिरच्छेद सुरूच आहे. राज्य बदलले आहे असे अजूनही वाटत नाही. नोटाबंदीच्या गुंगीतून आणि गोहत्येच्या मारामारीतून देश भानावर येईल त्या दिवशी उशीर झालेला असेल.

हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून पाकड्यांनी आमच्या दोन जवानांचा शिरच्छेद केला आहे. त्याच वेळी कश्मीरात दहशतवादी हल्ल्यात सात जण ठार झाले. पाच पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि जवान रोज शहीद होत आहेत. ‘जय जवान आणि जय किसान’चे नारे देण्याचा अधिकार आम्हाला उरला आहे काय? पाकड्यांकडून आमच्या जवानांच्या निर्घृण हत्या केल्या जात आहेत. अर्थात त्यांना हौतात्म्याचा दर्जा मिळत असला तरी हे सर्व हुतात्मे हिंदुस्थानच्या भूमीवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. नायब सुभेदार परमजीत सिंग आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांची हत्या पाकिस्तानच्या लष्कराने ज्या निर्घृणपणे केली त्या अमानुष आणि पाशवी कृत्याचा फक्त निषेध करून पाकड्यांचे काय वाकडे होणार आहे? नवे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे, ‘‘हे बलिदान व्यर्थ जाणार नाही!’’ माफ करा जेटलीजी, आम्हाला नाइलाजाने आणि विनम्रपणे सांगायलाच हवे की, जवानांचे बलिदान व्यर्थ चालले आहे. पाकिस्तानसारखा टीचभर आणि अराजकात होरपळणारा देश हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचा रोज कोथळा काढत असताना देशवासीयांना

नोटाबंदीच्या गुंगीचे औषध

देऊन झोपवता येणार नाही. उत्तर प्रदेशचा राजकीय विजय हा भाजपच्या दृष्टीने दिग्विजय असेलही; पण सीमेवर जवानांच्या ज्या प्रमाणात हत्या होत आहेत हा देशाचा पराभव आहे. वर्षभरात कोणत्याही थेट युद्धाशिवाय हजारावर जवानांचे बळी गेले आहेत. त्या शहीदांच्या शवपेटय़ांवर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी देशात राजकीय परिवर्तन झाले आहे काय? गोहत्येच्या वादात देशाची मने व मनगटे निस्तेज करून जवानांच्या हत्यांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न म्हणजे राष्ट्राला पिसाळलेल्या लांडग्यांच्या तावडीत देण्यासारखेच आहे. पाकिस्तानचे दहशतवादी व जवान आमच्या लष्करी तळांवर सतत हल्ले करीत आहेत. पठाणकोट झाले, उरी झाले, मछली क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळील लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ला झाला. हे सर्व प्रकार रोखण्यास तुमचे ते सर्जिकल स्ट्राइकही कुचकामीच ठरले. उत्तर प्रदेशच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राइकचा इतका बेंडबाजा वाजवला की, हे सर्जिकल स्ट्राइक जवानांनी केले नाही तर भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनीच केले असेच वातावरण निर्माण केले. हीसुद्धा जवानांच्या शौर्याची विटंबनाच होती; पण देश गुंगीत ढकलल्यावर बोलायचे कोणी व बोलणाऱयांवर विश्वास ठेवायचा कोणी? नोटाबंदी व गोहत्याविरोध हा देशातील

सर्वच समस्यांवरील रामबाण उपाय

असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले; पण नोटाबंदीनंतर पाकिस्तानचे हल्ले व देशांतर्गत दहशतवाद शतपटीने वाढला. गोहत्येचे पातक नको असे ज्यांना वाटते त्यांना जवानांच्या हत्येचे पातक चालते काय? मांसाहार करणाऱ्यांना विरोध, मग जवानांच्या रक्तामांसाचा जो चिखल सुरू आहे तो पाकड्यांचा शाकाहार मानून श्रद्धांजल्यांची चटईश्राद्धं उरकायची काय? हे प्रश्न घणासारखे घाव घालत आहेत. पाकिस्तानच्या सापळय़ात आम्ही फसलो आहोत. जगातले किती देश या प्रश्नी आमच्या बाजूने उभे आहेत ते पंतप्रधानांनी जाहीर करावे. संरक्षण मंत्री व संरक्षण खाते किती गांभीर्याने काम करते, ते माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची पूर्वीची वक्तव्ये आणि त्यांच्या गोव्यातील ‘रिटर्न तिकिटा’वरून स्पष्ट होते. काँग्रेस राजवटीत जवानांच्या शिरच्छेदाचे प्रकार झाले तेव्हा एका जवानाच्या बदल्यात पाकड्यांची दहा मुंडकी कापून आणू अशा वीर गर्जना करणाऱ्यांचे राज्य दिल्लीत आहे; पण पाकड्यांकडून आमच्या जवानांचा आणि स्वाभिमानाचा शिरच्छेद सुरूच आहे. राज्य बदलले आहे असे अजूनही वाटत नाही. नोटाबंदीच्या गुंगीतून आणि गोहत्येच्या मारामारीतून देश भानावर येईल त्या दिवशी उशीर झालेला असेल.

आपली प्रतिक्रिया द्या