विरोधी पक्षनेत्यांसह कश्मीर दौऱ्याची राहुल यांची मागणी राज्यपालांनी फेटाळली

879

विरोधी पक्षनेत्यांसह जम्मू कश्मीरचा दौऱ्याची परवानगी द्यावी आणि स्थानिकांना भेटण्याची परवानगी द्यावी ही माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मागणी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी फेटाळली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यामुळे कश्मीरमध्ये समस्या निर्माण होतील, स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागेल आणि खोऱ्यातील शांतता धोक्यात येईल असे जम्मू कश्मीरच्या राजभवनातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची मागणी नाकारत असल्याचे राज्यपाल मलीक यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधी पक्षनेत्यांसह कश्मीर खोऱ्याचा दौरा करून स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी ट्विट करत राज्यपालांकडे केली होती. राहुल गांधी कश्मीर समस्येचे राजकारण करत आहेत. कश्मीरबाबत पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊन राहुल यांनी मते बनवू नये, असे आवाहनही मलीक यांनी केले आहे. काही तूरळक घटना वगळता कश्मीर खोऱ्यात शांतता आहे, असेही मलीक यांनी स्पष्ट केले. कलम 370 रद्द केल्यानंतर कश्मीर खोऱ्यात अशांतता असून हिंसाचार वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर राज्यपाल मलीक यांनी राहुल यांनी कश्मीरचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घ्यावी असे सांगत कश्मीर दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. या दौऱ्यासाठी विमानाची व्यवस्था करू, असेही मलीक म्हणाले होते. आम्हाला विमानाची गरज नाही, मात्र, कश्मीर खोऱ्यात स्थानिक जनतेशी संवाद साधण्याची, स्थानिक नेत्यांशी आणि सुरक्षेसाठी तैनात जवानांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेण्याची परवानगी द्यावे असे राहुल यांनी म्हटले होते.

राहुल यांची ही मागणी राज्यपालांनी नाकरली आहे. राहुल यांनी खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये, खोऱ्यात शांततेचे वातावरण आहे, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि मकाप,भाकपचे महासचिव डी, राजा आणि सीताराम येचुरी यांना विमानतळावरच रोखण्यात आले होते. त्यांना खोऱ्यात जाण्याची तसेच स्थानिकांशी नेत्यांना भेटण्याची परवानगी नाकरण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या