जम्मू कश्मीर- हंदवाडा भागात झालेल्या चकमकीत मेजरसह पाच जवान शहीद

1479

जम्मू- कश्मीरच्या हंदवाडा भागात झालेल्या चकमकीत हिंदुस्थानचे चार जवान आणि एक पोलीस अधिकारी असे पाच जण शहीद झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

शनिवारपासून पुलवामा आणि हंदवाडा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी सुरू होत्या. हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत एक कमांडिंग ऑफिसर, 21 राष्ट्रीय रायफल्सचे एक मेजर, दोन सैनिक आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी पराक्रमाची शर्थ करून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवू नये म्हणून हंदवाडा येथील एका घरावर 21 राष्ट्रीय रायफल्सच्या पथकाने छापा टाकला आणि घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्या घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. या चकमकीत पाच जण शहीद झाले तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. घरात अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शहीद कर्नल शर्मा यांनी यापूर्वीही अशा साहसी मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या होत्या.

या आधी शनिवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचे समजते. चकमकीनंतर स्थानिकांनी जवानांवर तुफान दगडफेक केली होती. 

आपली प्रतिक्रिया द्या