जम्मू कश्मीर- कुलगाम जिल्ह्यात चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

480

जम्मू कश्मीरमधील कुलगाम या जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोन्ही दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कुलगाम जिल्ह्यातील वामपोरा या गावात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार दलांनी शोधमोहीम राबवली. हे दहशतवादी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे असावेत, असा त्यांचा अंदाज होता. त्यामुळे संयुक्तरित्या ही मोहीम राबवण्यात आली.

प्रत्यक्ष चकमकीवेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना बोलवून आणलं होतं. या कुटुंबीयांनी त्यांना शरण येण्याची गळ घातली. मात्र, ते दोन्ही दहशतवादी त्याला बधले नाहीत. अखेर सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा केला. हे दोन्ही दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीनचे असल्याचं वृत्त आहे. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी काहीतरी घातपात घडवण्याचा कट शिजत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या