जम्मू-कश्मीर, लडाख आणि हिमाचलमध्ये पावसाचा कहर; 16 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. महाराष्ट्रात पावसाने 200 हून अधिक बळी घेतल्यानंतर आता केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्येही भयंकर पाऊस कोसळत आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्येही पावसाचे उग्र रुप पाहायला मिळत असून आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक बेपत्ता आहेत.

जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सुदूर गावात बुधवारी ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे येथे 7 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जखमी झाले. सकाळी साडे चार वाजता ही घटना घडल्याचे तहसीलदारांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात पुल, नदीशेजारील सहा घरं आणि एक दुकान वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले.

किश्तवाडचे जिल्हा विकास आयुक्त अशोक कुमार शर्मा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आभाळ फाटल्याने पूर आला असून यात 7 जणांचा मृत्यू झाला. सातही जणांचे मृतदेह सापडले असून 17 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही ते म्हणाले.

हिमाचलमध्ये 9 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू, चंबा आणि लाहौर-स्पिती येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 जण बेपत्ता असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या