व्हिडीओ : तरुणीची छेड काढण्याच्या प्रयत्नात तरुण जखमी

27

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू-कश्मीरमधील डोडा जिल्ह्यात एका तरुणाला दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीची छेड काढणे चांगलेच महागात पडले आहे. हा तरुण दुचाकीवरील तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटला व तिची दुचाकी थेट त्याच्यावर जाऊन आदळली. या अपघातात तो तरुण जखमी झाला असून तरुणी देखील जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याात आला आहे.

पीडित तरुणी दुचाकीवरून कॉलेजवरून घरी परतत होती. त्यावेळी त्यांच्या पुढे असलेल्या दुचाकीवर उमर फारुख, अझर वाणी आणि नयीम इक्बाल हे तीन तरुण जात होते. तरुणीची गाडी मागून येत असल्याचे पाहून उमर फारुखने दुचाकीवरून उतरून रस्त्याच्या मध्ये येत तरुणीची दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. उमर अचानक मध्ये आल्याने तरुणीचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी उमरवर आदळली. या अपघातात उमर जखमी झाला असून तरुणी देखील बाईकसोबत फरफटत गेल्याने जखमी झाली आहे. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या