J&K- नौशेरा भागात पाकिस्तान्यांचा गोळीबार, प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं वृत्त आहे. हिंदुस्थानी सैन्याने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. या वेळी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.

गेल्या आठवड्याभरात सीमाभागात अनेकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. उरी ते गुरेज या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक अनेकदा गोळीबार करण्यात आला होता. त्यात हिंदुस्थानच्या सुरक्षा दलांचे चार कर्मचारी शहीद झाले होते.

आता राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्याला हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत हिंदुस्थानी सैन्यातील 16 कॉर्प्समधील हवालदार संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले आहेत.

शहीद जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा (ता.करवीर) चे सुपुत्र होते. गेल्याच आठवड्यात ऐन दिवाळी दिवशी बहिरेवाडी,ता. आजरा येथील अवघ्या 20 वर्षाचे जवान ऋषिकेश जोंधळे हे जम्मु काश्मीर येथे पाकिस्तान सैन्याशी लढताना शहिद झाले होते. दुसऱ्याच आठवड्यात आज जिल्ह्यातील आणखी एक सुपुत्र शहीद झाल्याने, संपूर्ण जिल्हाच हळहळला आहे.

गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणार्थ शहीद झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली. कुटुंबाचा एकूलता एक मुलगा सीमेवर शहीद झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद जवान संग्राम पाटील यांना नुकतीच हवालदार म्हणून बढती मिळाली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व बहिणी असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या