
खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याच्याविरोधात पंजाब पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. पोलिसांनी त्याच्या साथिदारांना अटक केली असून अमृतपाल याला फरार घोषित केले आहे. देशभरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. पंजाब पोलिसांच्या या सर्च ऑपरेशनसाठी अनेक राज्यातील पोलीस मदत करत आहेत. दरम्यान, पंजाब पोलिसांना अमृतपालच्या जम्मू-कश्मीर कनेक्शन संदर्भात मोठी लीड मिळाली आहे. याप्रकरणात जम्मू-कश्मीर पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. अमृतपाल याचा साथीदार पप्पलप्रीत सिंगशी त्यांचे कनेक्शन असल्याचे वृत्त आहे. तसेच अटक करण्यात आलेली महिला ही पप्पलप्रीत सिंगच्या आत्याची मुलगी आहे.
अमरिक सिंग आणि सरबजीत कौर असे जम्मू-कश्मीर पोलिसांनी अटक केलेल्या जोडप्याचे नाव आहे. कुलिया गावातून त्यांना अटक करण्यात आली असून जम्मू-कश्मीर पोलिसांनी या जोडप्याला पंजाब पोलिसांकडे सोपवले आहे. पप्पलप्रीत सिंगने फरार होण्यापूर्वी सरबजीत सिंगशी संपर्क साधला होता हे त्याच्या कॉल डिटेल्सवरून उघड झाले आहे. तो तिच्याशी बरेच दिवस बोलत होता. मात्र फरार झाल्यानंतर तिचा त्याच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. पंजाब पोलीस 18 मार्चपासून अमृतपाल सिंह याचा शोध घेत आहेत. अमृतपाल सिंग पंजाबमधून बाहेर पळाला आहे. त्याच्यासोबत पप्पलप्रीत सिंगही फरार आहे.
याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे कौतुक केले आहे. काहीही झाले तरी पंजाब सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठे निर्णय घेताना मागे पुढे पाहणार नाही. यासोबतच शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
अमृतपाल सिंह फरार झाल्यानंतर पंजाब पोलीस मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन करत आहेत. तो पोलिसांना चकमा देत आहे. त्याने फरार होण्यासाठी गाड्या बदलल्या. त्याचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये तो एका टोलनाक्यावरुन जाताना दिसत आहे. दरम्यान तो टोल नाक्यावर असलेल्या मुलीसोबत काहीवेळ थांबून बोललाही आणि त्यानंतर तो निघून गेला.