जम्मू-कश्मीर व हिमाचल प्रदेशमधील सीमाविवाद विकोपाला

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर सरकारमधील सीमाविवाद आता विकोपाला पोहचला आहे. कारगिल पोलिसांनी हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेपार ११ किलोमिटरपर्यंत जात सरचू येथे पोलीस पोस्ट बनवली आहे, त्यामुळे हा वाद आणखी तापला आहे. सरचू हे स्थान मनालीपासून जवळजवळ २२२ किलोमीटर अंतरावर आहे.

सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे १९८४ मध्ये हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर राज्यांमध्ये सीमारेषा आखून देण्यात आली होती, परंतु आता कारगिल प्रशासनाने ही सीमारेषा मानण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला आहे. १९८४ मध्ये लाहौल-स्फीतिचे कमिशनर आमि लेहच्या कमिशनरने या सीमारेषांना मान्यता दिली होती. परंतु पोलिसांनी ज्या ठिकाणी (सरचू) पोलीस पोस्ट बनवली आहे हे ठिकाण हिमाचल प्रदेशमध्ये नाही तर जम्मू-कश्मीर राज्यात येते असा दावा कारगिल प्रशासनाने केला आहे. आता जम्मू-कश्मीरची लोकं लाहौलच्या स्थानिक लोकांना सरचू सोडण्यास सांगत असल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे.

लाहौल स्फीतीचे एसपी राजेश धरमानी यांनी पोलीस ताफ्यासह २६ मे रोजी सरचूचा दौरा केला होता. या ठिकाणी कोणताही अकायदेशीर प्रकार सहन केला जाणार नाही असे एसपी धरमानी यांनी म्हटले आहे. तसेत कारगिल हिमाचलच्या ११ किलोमीटर भूभागावर दावा करत असल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे धरमानी यांनी सांगितले. हा वाद तब्बल १० वर्षापासून सुरू असल्याचे धरमानी यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे जम्मू-कश्मीरच्या कारगिल पोलिसांनी लाहौल स्फीती पोलीस या प्रकरणी सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या