कश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार

9

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दलगाम भागात हिंदुस्थानी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात जवानांना यश आले आहे. बशीर लष्करी आणि आजद मलिक अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यापैकी बशीर लष्करीचा मागील सहा महिन्यात पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये समावेश होता.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बशीर लष्करी आणि अन्य तीन दहशतवादी दलगाम भागातील एका घरात लपल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानंतर जवानांनी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी घेराव घातला. जवानांनी परिसराला घेराव घातल्याचे कळताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळाबारात लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी काही नागरिकांचे अपहरण केले होते.

दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिलेला जीव गमवावा लागला. ताहिरा (४४) असे या मृत महिलेचे नाव आहे. चकमकीदरम्यान गोळी लागल्याने तिला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. मात्र दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या इतर नागरिकांची जवानांनी सुटकी केली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेले दहशतवादी १६ जून रोजी अचाबल भागात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. या हल्ल्यात वरिष्ठ अधिकाऱ्यासह सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या