धक्कादायक! जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी

जम्मू कश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यातील एक दहशतवादी साजद नवाब दार हा मूळचा उत्तर कश्मीरच्या सोपोर येथील होता. बुधवारी या दहशतवाद्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात धक्कादायक बाब अशी की तेथील स्थानिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम धुडकावून लावत या दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आज दहा जणांना अटक केली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

जम्मू कश्मीरमधील केरन सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांसोबत शनिवार व रविवार असे दोन दिवस झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले होते. या चकमकीत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. त्यातच दार याचाही खात्मा झाला होता. बुधवारी त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे दिल्यानंतर त्याच्या गावातील नागरिक हजारोच्या संख्येने त्याच्या घराबाहेर उपस्थित होते. प्रशासनाने लॉकडाऊन काळात घऱाबाहेर न पडण्याचे आदेश दिलेले असतानाही या नागरिकांनी नियमांना हरताळ फासत अंत्यसंस्काराला हजेरी लावली.

आपली प्रतिक्रिया द्या