प्रवाशांनी खचाखच भरलेले वाहन दरीत कोसळले, अपघातात 16 जणांचा मृत्यू

जम्मू-कश्मीरमध्यो डोडा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. बटोटे-किश्तवाड महामार्गावर झालेल्या प्रवासी वाहनाच्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डोडा जिल्ह्यातील खिलैनी येथे मंगळवारी बटोटे-किश्तवाड महामार्गावरून प्रवासी वाहनाचा अपघात झाला. प्रवाशांनी खचाखच भरलेले वाहन जवळपास दोन हजार फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. अपघात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांनी रुग्णालयात दम तोडला. मृत्यू झालेले नागरिक नेमके कोणत्या भागातील आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी धाव घेतली. यानंतर बचावकार्य युद्घपातळीवर सुरू झाले. मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या