2019मध्ये जान शेख बहरीनला गेला होता! गँगस्टर अली बुदेशच्या हत्येची सुपारी वाजवायला गेला पण काही न करता परतला

गँगस्टर फईम मचमचच्या सांगण्यावरून छोटा शकीलचा पंटर अली बुदेश याची हत्या करण्यासाठी जान शेख ऊर्फ समीर कालिया हा 2019मध्ये बहरीनला गेला होता. पण तिथे गेल्यानंतर बुदेशच्या मर्डरची सुपारी न वाजवताच जान शेख हिंदुस्थानात परतला होता.

देशात घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी पकडले. त्यात मुंबईच्या धारावीत राहणारा आणि दाऊद टोळीशी संबंधीत असलेला जान शेख याचा समावेश आहे. जान शेखच्या अटकेनंतर त्याची पुंडली आता उघडू लागली आहे. कर्जबाजारी झालेल्या जान शेखकडे पासपोर्ट आहे. अलीकडेच मरण पावलेला गँगस्टर फईम मचमचच्या तो संपर्कात होता. फईमच्या सांगण्यावरून जान शेख 2019मध्ये बहरीनला गेला होता. तेथे जाऊन त्याला गँगस्टर आणि कुप्रसिद्ध खंडणीखोर अली बुदेश याची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली होती. पण जान शेखला अली बुदेशची हत्या करता आली नाही. त्यामुळे तो गेला तसा माघारी परतला होता. अली बुदेश हा बहरीनमध्ये वास्तव्यास असून टोळीतील अंतर्गत वादातून अली बुदेशच्या मर्डरची सुपारी देण्यात आली होती. पण तो गेम फसला होता, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

सहा जणांचे पथक दिल्लीत दाखल

घातपात करण्याच्या तयारीत असल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी जान शेखच्या कोटा येथे मुसक्या आवळल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचे चार आणि मुंबई गुन्हे शाखेचे दोन असे सहा अधिकाऱ्यांचे पथक दिल्लीला गेले आहे. हे पथक जान शेखची चौकशी करून गुह्याची माहिती घेणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या