आदित्य ठाकरे २९ ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यात – खासदार जाधव

2388

युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने २९ ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यात येत असून बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा येथे त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील खासदार जनसंपर्क कार्यालयात आज खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी खासदार जाधव यांनी युवासेना प्रमुख यांची जनआशिर्वाद यात्रा २९ ऑगस्टला अकोला व बुलढाणा जिल्ह्यात आयोजित केली असल्याची माहिती देवून सदर जनआशिर्वाद यात्रा दुपारी ३ वाजता बुलढाणा येथे पोहोचून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जयस्तंभ चौकात सभेद्वारे जनतेशी संवाद साधणार आहे. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता चिखली येथे रोड शो व जाहीरसभा व सायंकाळी सहा वाजता देऊळगावराजा येथे जाहीर सभा घेणार आहे. या दौर्‍यासाठी शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन तयारी करण्यात आली आहे. अशीही माहिती त्यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या बुलढाणा जिल्ह्यातील जागा शिवसेनेला सोडून घेतील त्या जागा आम्ही निवडून आणू. महाराष्ट्रात युतीचे २२० आमदार निवडून आणण्याचा चंग पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधला आहे. जिथे शिवसेनेची ताकद जास्त आहे त्या जागा शिवसेनेला मिळतील. बुलढाणा विधानसभेची जागा शिवसेनेने ४ वेळा जिंकली आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळेल असा आशावाद व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की, सर्वच जागांबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. जनमत चाचणी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून आगामी विधानसभेची उमेदवारी शिवसेना पक्ष देणार आहे.

खामगाव – जालना रेल्वे मार्गावर बोलताना खासदार जाधव म्हणाले नुकतीच काल भुसावळ येथे रेल्वे बोर्डाची मिटींग झाली असून या मार्गासाठी पुजी निवेश सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली असल्याची त्यांनी माहिती देवून जिल्ह्याचे वाळवंट होण्यापासून वाचविण्यासाठी ब्रह्मपुत्रा ते कावेरी असा जो नदीजोड प्रकल्प होत आहे त्यामध्ये वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा अशा नद्या जोडण्यात येऊन जिल्ह्याला याचा फायदा मिळणार आहे. यासाठी मी सतत प्रयत्नशील असल्याचेही खासदार जाधव यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख द्वय जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, माजी जिल्हा प्रमुख धिरज लिंगाडे, उपजिल्हाप्रमुख द्वय भोजराज पाटील, संजय गायकवाड, तालुकाप्रमुख डॉ. सावळे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या