”ते फकस्त ६०० व्हते…” पावनखिंडीतली ‘ती’ ऐतिहासिक लढाई दाखवणार ‘जंग जौहर’

3367

महाराष्ट्राच्या रांगड्या भूमीला धगधगता आणि संघर्षमयी इतिहास लाभला आहे. अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवत आजवर अनेक शूरवीरांनी महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे अनेक वीरयोद्धे या भूमीने महाराष्ट्राला दिले आहेत. ज्यांचे धैर्य, शौर्य आणि आवेश पाहून शत्रूही थबकला होता, अशा झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या अजोड पराक्रमाचा अध्याय उलगडून दाखविणाऱ्या ‘जंगजौहर’ या ऐतिहासिक चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

१३ जुलै १६६०, आषाढ शुद्ध पौर्णिमा…. मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित अध्याय याचदिवशी घोडखिंडीत लिहिला गेला. अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा हा ठसठशीत वस्तूपाठ जगासमोर साकारला गेला. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे. पावनखिंडीचा रणसंग्राम घडून कित्येक वर्षाचा काळ लोटला असला तरी या रणसंग्रामाचा आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा, बलिदानाचा इतिहास आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करून घेऊन विशाळगडाकडे कूच केले. पाठलागावर असलेल्या विजापूरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजींनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोंच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि 300 बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. छत्रपतींना वाचवताना बांदल सेना व बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातीर्थ झाले आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.

बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ अशा शिवचरित्रावर आधारीत यशस्वी चित्रपटांच्या मालिकेतील पुढचं सुवर्णपान युवा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आपल्यापुढे उलगडणार आहेत. अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांच्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’ने या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे.

याच ऐतिहासिक लढाईची गाथा मोठ्या पडद्यावर साकारणाऱ्या जंग जौहर या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर ‘ते फकस्त ६०० व्हते’ ही ओळ रेखाटण्यात आली आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त अशा दमदार ऐतिहासिक चित्रपटांचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. आपल्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाला त्याने महाराष्ट्राच्या चरणी अर्पण केल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

यात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर यांच्यासह सुमारे 21 कलाकारांची भली मोठी मांदियाळी दिसणार आहे. लहानपणापासून ऐकलेला पावनखिंडीतील दिव्य पराक्रमाचा इतिहास पडद्यावर अनुभवणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘जंगजौहर’ चित्रपटाचे चित्रीकरण संपवून लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. त्याआधी 13 जुलैला, सोमवारी या चित्रपटाची पहिली झलक पोस्टर आणि टीझर रुपात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या