शाही युगाची सुरुवात 27 एप्रिल ते 6 मेपर्यंत विशेष रजा

सामना ऑनलाईन। टोकियो

एकाच देशातील तब्बल सहा लाख 62 हजार लोक एकाचवेळी विदेशात फिरायला जायला निघतात म्हणजे आश्चर्यच ना… पण जपानमध्ये तसं घडतंय. कारण या लोकांना एकाचवेळी 10 दिवसांची रजा मंजूर झाली आहे. जपानचे नवे राजे नारुहितो यांचा राज्याभिषेक 1 मे रोजी होणार आहे. या शाही युगाची सुरुवात म्हणून सरकारने लोकांना 27 एप्रिल ते 6 मेपर्यंत विशेष रजा दिली आहे. आता नोकरीच्या गडबडीत एवढी रजा मिळाल्यावर बहुतेकांनी परदेशात फिरून येण्याचा प्लान आखला आहे. जपानमधले सहा लाखांहून जास्त लोक परदेशात फिरायला जाणार असले तरी देशात आणखी किमान अडीच कोटी लोक आहेत जे देशांतर्गतच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत आखत आहेत. यामुळे देशात पर्यटनावर जवळपास 66 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत असे स्पष्ट झाले आहे. जपानमध्ये बहुतेक लोकांनी युरोपला फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

45 टक्के लोक नाराज

जपानमध्ये दरवर्षी 1 ते 7 मे या कालावधीत सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टीच असते. पण यंदा नव्या राजांच्या राज्याभिषेकामुळे ही रजा 10 दिवसांची देण्यात येणार आहे. या जादा सुट्टीला किमान 45 टक्के लोकांनी सुट्टीमध्ये बाहेरगावी जाण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याउलट 35 टक्के लोकांनी वाढीव सुट्टीबाबत आनंद व्यक्त केला असून खूप फिरू, मजा करू अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.