डोळे बघ, डोळे बघ करत घरी पोहचला, पॉपस्टारवर बलात्काराचा प्रयत्न

आजच्या या सोशल मीडियाच्या जगात अनेक जणांना काही काम करत असताना किंवा मित्रांसोबत मजामस्ती करत असताना, आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय झाली आहे. तुम्हीही जर असेच करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जपानमधील पोलिसांनी एका इसमाला महिलेचा पाठलाग करून तिच्यावर हल्ला केल्या प्रकरणी अटक केली आहे. हिबिकी सैतो (वय 26) असं अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. हिबिकीने हल्ला केलेली महिला ही जपानमधील प्रसिद्ध पॉप स्टार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिबिकी हा 21 वर्षीय पॉप गायिका ऍना मात्सुका हीचा चाहता आहे. तो सोशल मीडियावर ऍना हिला फॉलो करत होता. हिबिकाने ऍनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो मध्ये तिचे डोळे पाहून ऍनाचा घरचा पत्ता सांगितला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या मते, हिबिका हा फोटोमध्ये तिच्या डोळ्यातील प्रतिबिंब झूम करून तपासत होता. ऍना जेव्हा फोटो क्लिक करत असे तेव्हा तिच्या डोळ्याच्या बाहूलीत अवतीभोवती दिसणाऱ्या जागेचा तो अंदाज लावत असे. यानंतरच गूगल मॅपच्या मदतीने तो त्या जागेचा शोध घेत होता.

हिबिकीने ऍना कुठे राहते याची माहिती मिळवली होती. तो ऍनाच्या न कळत काही दिवस तिचा पाठलाग करत होता. एकेदिवशी ऍना घरी जात असताना हिबिकाने तिचा पाठलाग केला. रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून त्याने ऍनावर हल्ला करत तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऍनाने कशीबशी आपली सुटका करत तिथून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी हिबिकाला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. यापुढे तुम्हीही सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करताना एकदा नक्की विचार करा.

आपली प्रतिक्रिया द्या