भरधाव बुलेट ट्रेनचे नियंत्रण सोडून ‘शू’ करायला गेला, ड्रायव्हरला शिक्षा होण्याची शक्यता

वेगात धावत असलेल्या बुलेट ट्रेनचे नियंत्रण सोडून ‘शू’ साठी गेलेल्या ड्रायव्हरला शिक्षा होण्याची शक्यता आहे.जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा ट्रेन 150 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावत होती आणि ट्रेनमध्ये 160 प्रवासी प्रवास करत होते. शिशिरो ( ड्रायव्हरचे बदललेले नाव) याला जोराची शू लागल्याने त्याने नियंत्रण केबिन सोडून बाथरूमच्या दिशेने धूम ठोकली होती.

शिशिरोने गाडीचं नियंत्रण हे ट्रेनच्या संचालनाबद्दल फारशी माहिती नसलेल्या कंडक्टरच्या हाती दिलं होतं. गाडी वेगात असताना शिशिरोने त्याची केबिन सोडून प्रवाशांसाठी असलेल्या बाथरुमचा वापर केल्याचं उघड झालं असल्याचे जपान रेल्वेने सांगितले आहे. हिकारी 633 या ट्रेनमध्ये हा प्रकार घडला असून ही ट्रेन शिझुओका भागातून जात असताना शिशिरोने केबिन सोडलं होतं.

जपामधील बुलेट ट्रेन ही केंद्रीय कॉम्प्युटराईज प्रणालीद्वारे संचालित केली जाते. अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास ट्रेनवर नियंत्रण रहावे यासाठी ड्रायव्हर नेमण्यात आलेले असतात. गरज पडल्यास ट्रेनचा ब्रेक लावण्यास किंवा वेग वाढवण्यासाठीही या ड्रायव्हरची मदत घेतली जाते. शिशिरो लघुशंकेसाठी गेल्याने ट्रेन 1 मिनिट उशिराने स्थानकावर पोहोचली होती. यामुळे शिशिरो केबिन सोडून गेल्याचं रेल्वेप्रशासनाला कळालं होतं. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांना कळवली आणि घडल्याप्रकाराबद्दल माफी मागितली.

ड्रायव्हरला अशा प्रकारे केबिन सोडण्याची गरज पडल्यास त्याने केंद्रीय नियंत्रण कक्षाला याबाबत कळवणं गरजेचं असतं. तातडीच्या प्रसंगी ड्रायव्हर प्रशिक्षित कंडक्टरच्या हाती गाडीचे नियंत्रण देऊ शकतो अथवा गाडी ट्रॅकवर किंवा जवळच्या स्थानकावर थांबवून बाथरूमला जाऊ शकतो. शिशिरो केंद्रीय नियंत्रण कक्षाला न कळवताच बाथरूमला गेला होता. मासाहिरो हयात्सू हे जपान रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी असून त्यांनी हा सगळा प्रकार चुकीचा होता असं म्हणत माफी मागितली आहे. शिशिरो आणि कंडक्टर दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे.

शिशिरोने या प्रकाबाबत त्याची बाजू मांडताना म्हटलंय की ट्रेन उशिरा पोहोचावी असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. बाथरूमला जायचं असल्याचं सांगणं लाजिरवाणं वाटत असल्याने आपण ते नियंत्रण कक्षाला सांगितलं नाही असं शिशिरोचं म्हणणं आहे. जपान रेल्वे ही वक्तशीरपणा आणि सुरक्षित प्रवासासाठी वाखाणली जाते. सुरक्षेसंदर्भातील नियमांशी कोणतीही तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे त्यांना हे शक्य झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या