पंतप्रधान कार्यालयात पार्टीचे आयोजन, जपानच्या पंतप्रधानांची मुलावर कारवाई

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा मोठा मुलगा शोतारो याने वडिलांच्या अधिकृत निवासस्थानी पार्टी केली. यामुळे त्याला कार्यकारी धोरण सचिव पदावरून काढून टाकण्यात आले. शोतारोने पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी मित्र आणि नातेवाईकांसोबत पार्टी केल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर  देशभरातून त्याच्यावर टीका होत आहे. यामुळे त्याचे वडील पंतप्रधान किशिदा यांनी त्याला पदावरून निलंबित केले आहे. त्यांच्या मुलावर यापूर्वीही पदाचा गैरवापर केल्याबद्दल टीका झाली होती.

पार्टीच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शोतारो आपले मित्र आणि नातेवाईकांसह पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाच्या पायऱ्यांवर पसरलेल्या रेड कार्पेटवर पोझ देताना दिसत आहे. काही छायाचित्रांमध्ये तो आणि त्याचे मित्र रेड कार्पेटवर पहुडलेले दिसत आहेत. एका छायाचित्रात शोतारो पंतप्रधानांसाठी राखीव असलेल्या जागेवर उभा असल्याचे दिसत आहे. येथे उभा राहून तो आपल्या वडिलांची नक्कल करत आहे असल्यासारखेच भासत आहे तसेच काही लोक पंतप्रधान निवासस्थानाच्या व्यासपीठावर उभे राहून पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत, असा हावभाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत.

द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, सोमवारी रात्री पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सांगितले की, “पंतप्रधानांचे राजकीय सचिव या नात्याने लोकांसाठी ते एक जबाबदार व्यक्तीमत्त्व आहे, असे असूनही त्याने केलेले हे कृत्य अनुचित होते. म्हणून मी त्याच्याकडून त्यांची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.” तसेच त्यांनी पुढे सांगितले की, गुरुवारी त्यांच्या मुलाच्या जागी दुसरे सचिव ताकायोशी यामामोटो यांची नियुक्ती केली जाईल.

मुख्य कॅबिनेट सचिव, हिरोकाझू मात्सुनो यांनी किशिदा यांच्या मुलाने पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी केलेली पार्टी अयोग्य असल्याचे म्हटले असून ते पुढे म्हणाले की, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. सुमारे 100 वर्षे जुने पंतप्रधानांचे निवासस्थान पूर्वी पंतप्रधान कार्यालय होते. 2005 मध्ये जेव्हा नवीन पंतप्रधान कार्यालय बांधले गेले तेव्हा ते पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान बनले.

वैयक्तिक हेतूसाठी पदाचा वापर..
पंतप्रधान किशिदा यांच्या मुलाने आपल्या पदाचा वैयक्तिक हेतूसाठी वापर केला आहे. तो वडिलांसोबत ब्रिटन आणि पॅरिस येथील दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्याने दूतावासाच्या गाड्या खासगी दौऱ्यासाठी वापरल्या जात होत्या. लंडनमधील एका लक्झरी डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये कॅबिनेट मंत्र्यांसाठी स्मृतीचिन्ह खरेदी करण्यासाठीही त्याने दुतावासाच्या गाडीचा वापर केल्याबद्दल त्याला खडसवण्यात आले होते. पंतप्रधान किशिदा यांनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या मुलाला पंतप्रधानांच्या आठ सचिव पदांपैकी एका पदावर नियुक्त केले. शोतारोच्या या नियुक्तीवर विरोधी खासदारांनी किशिदा यांच्यावर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता.