शिवसेना जनतेच्या पाठीशी ठाम, उद्धव ठाकरेंची ग्वाही

38

सामना ऑनलाईन, मुंबई

राजापूर तालुक्यातील नाणार आणि चौदा गावांच्या परिसरांत होऊ घातलेल्या पेट्रो रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला आहे. शिवसेना या ग्रामस्थांना वाऱयावर सोडणार नाही. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार, अशी ग्वाही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला दिली.

संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि काही प्रमुख ग्रामस्थांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हा प्रकल्प येऊ देऊ नका असे गाऱहाणे मांडले. हा पेट्रो रिफायनरी प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्पाला लागूनच आहे. या प्रकल्पांमुळे कोकणची राखरांगोळी होणार आहे. भविष्यात ही सुवर्णभूमी उद्ध्वस्त होईल अशी भीती आहे. म्हणूनच या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध असल्याचे संघर्ष समितीने सांगितले.

शिवसेना जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी असून प्रकल्पासाठी सत्तर टक्के ग्रामस्थांची संमती आवश्यक आहे. म्हणूनच सत्तर टक्के नव्हे तर शंभर टक्के ग्रामस्थांनी आपली एकजूट कायम ठेवावी असे उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला सांगितले, अशी माहिती या बैठकीनंतर शिवसेना सचिव खासदार, विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली.या बैठकीला रत्नागिरी जिल्हय़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या