दर सहा महिन्यांनी निवड प्रक्रिया बदलणाऱ्या राष्ट्रीय रायफल संघटनेमुळे (एनआरएआय) हिंदुस्थानातील नेमबाजांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत चुकीची निवड प्रक्रिया बदलत नाही तोपर्यंत नेमबाजांचे काही खरे नसल्याची टीका हिंदुस्थानला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून देणाऱ्या मनू भाकरचे प्रशिक्षक आणि ज्येष्ठ नेमबाज जसपाल राणा यांनी केली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत हिंदुस्थानला एकही पदक न मिळू शकल्यामुळे ‘एनआरएआय’ने 2021 पासून नेमबाजांच्या निवड प्रक्रियाच बदलून टाकली. त्यामुळे ऑलिम्पिक कोटा मिळवणाऱ्या नेमबाजांच्या बोनस गुणांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात आणि त्यानंतर संघाच्या निवड चाचणीसाठी ट्रायल्सची सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंचे नुकसान झाले आहे आणि ही प्रक्रिया लवकरच बदलली नाही तर नेमबाजीचे खूप मोठे नुकसान होईल, अशा साशंकता राणा यांनी बोलून दाखवली.
‘एनआरएआय’च्या चुकीच्या धोरणांमुळे सौरभ चौधरी आणि जितू रायसारखे दिग्गज काही वर्षांत दिसेनासे झाले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारणारा सौरभ एकमेव होता. जितू रायसुद्धा हिंदुस्थानी नेमबाजीचा स्टार होता. आता हे दोघे कुठे आहेत? कुणी त्यांच्याबद्दल बोलतो तरी का? अर्जुन बबुताचे पदक थोडक्यात हुकले.
कुणी त्यांची माहिती घेतोय का? कुणी त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय का? परिवर्तनाचा मी कधीही विरोध करत नाही, परंतु ऑलिम्पिकच्या तयारीसाठी अधिक सातत्य राखणे गरजेचे आहे. आमच्याकडे ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सुरक्षा देण्याचे कोणतेही तंत्र अस्तित्वात नाहीय. आमच्याकडे कोणते तंत्रच नसल्यामुळे आम्ही ऑलिम्पिक विजेत्यांना फार काळ रेंजवर पाहू शकत नसल्याची खंत राणा यांनी व्यक्त केली.