बुमरा, मानधनाला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला जगज्जेतेपद मिळवून देण्यात बहुमोल योगदान देणारा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेलाय. त्याला जून महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महिला गटात हा मान हिंदुस्थानची मराठमोळी क्रिकेटर स्मृती मानधना हिने पटकाविला. जसप्रीत बुमराने ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारावर शर्यतीत रोहित शर्मा आणि रहमानुल्ला गुरबाज यांना मागे टाकले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भन्नाट कामगिरी केल्याबद्दल त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बुमराह टी-20 वर्ल्ड कपमध्ये ‘मालिकावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याने या स्पर्धेत 8.26 च्या सरासरीने 15 बळी टिपले.